You are currently viewing मोती तलावाच्या आराखड्यावरून राजकीय खडाजंगी; संजू परब यांचा नगराध्यक्षांवर हल्लाबोल
Oplus_16908288

मोती तलावाच्या आराखड्यावरून राजकीय खडाजंगी; संजू परब यांचा नगराध्यक्षांवर हल्लाबोल

“मान्यता नसताना स्वप्नरंजन नको”; मोती तलाव प्रकल्पाच्या घोषणांवरून प्रशासनिक प्रक्रियेचा मुद्दा ऐरणीवर

सावंतवाडी :

मोती तलावाच्या कायापालटाबाबत करण्यात आलेल्या घोषणांवरून सावंतवाडीतील राजकारण तापले असून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी विद्यमान नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ आकर्षक आराखडे आणि मोठमोठ्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करू नये, असा इशारा देत त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय व शासकीय मान्यता मिळाल्या आहेत का, असा थेट सवाल उपस्थित केला. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी मांडलेला आराखडा चुकीचा असून तो जनतेसमोर मांडण्याआधी नगरसेवकांसोबत चर्चा करून सूचना विचारात घ्याव्यात. तसेच कोणत्याही विकासकामाची घोषणा करण्यापूर्वी त्याला प्रशासकीय आणि शासकीय मंजुरी असणे आवश्यक असते, नंतरच तो जाहीर करावा.

मोती तलावाच्या सुशोभीकरणासंदर्भात बोलताना परब यांनी नगराध्यक्षांच्या भूमिकेतील विसंगतीकडे लक्ष वेधले. तलावाच्या काँक्रीटीकरणाला विरोध करणारेच आता तीन मजली भिंतींचे समर्थन करत आहेत. ही भिंतही काँक्रीटचीच आहे, मग पूर्वीचा विरोध कुठे गेला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जागेच्या वादामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न गेली दहा वर्ष प्रलंबित ही वस्तुस्थिती आहे. याशिवाय मोती तलाव परिसराशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांकडेही त्यांनी लक्ष वेधले. या जागेबाबत सध्या न्यायालयात खटले प्रलंबित असून भविष्यात शासनाची मंजुरी मिळाली तरी न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रकल्प अडचणीत येऊ शकतो. ही वस्तुस्थिती जनतेपासून लपवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, मार्केटची इमारत, बाजूचे अग्निशमन केंद्र, तसेच ५७ कोटींची नळपाणी योजना यांसारख्या प्रकल्पांबाबत आधी सर्व प्रशासकीय मंजुरी मिळवून त्यानंतरच त्यांची माहिती जनतेसमोर ठेवली होती. आम्ही ते करून दाखवलं कागदावर चित्र काढून नाही. त्यामुळे विकासकामांबाबत घोषणांपेक्षा अधिकृत प्रक्रिया आणि मान्यता महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा