You are currently viewing पारपोली येथे ‘भात पीक शेतीशाळा’ उत्साहात संपन्न

पारपोली येथे ‘भात पीक शेतीशाळा’ उत्साहात संपन्न

पारपोली येथे ‘भात पीक शेतीशाळा’ उत्साहात संपन्न

कृषी विभागाकडून ‘गोकृपा अमृत’ निर्मितीचे प्रात्यक्षिक; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

सावंतवाडी :

तालुक्यातील पारपोली येथे कृषी विभाग, सावंतवाडी यांच्या वतीने ‘भात पीक शेतीशाळा’ वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे तसेच आधुनिक आणि सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे आयोजन व स्वागत सहायक कृषी अधिकारी श्री. नागनाथ साखरे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांचे स्वागत करून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या शेतीशाळेत उप कृषी अधिकारी श्री. विजय पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भात शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘गोकृपा अमृत’ या सेंद्रिय खत व कीटकनाशकाची माहिती देत त्याची प्रत्यक्ष निर्मिती कशी करावी, याचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. या सेंद्रिय पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी श्री. विजय गंबरे यांनी भात शेतीमध्ये शेतीशाळेचे महत्त्व स्पष्ट करताना, “शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने एकत्र येऊन शिकल्यास व अनुभवांची देवाणघेवाण केल्यास उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येतो,” असा मोलाचा सल्ला दिला.
उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच श्री. प्रमोद परब यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा कार्यक्रमांमुळे गावकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा मिळत असल्याचे सांगितले.
या शेतीशाळेला पारपोली गावातील प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये श्री. बाळा डांगी, श्री. एकनाथ परब, श्री. विठ्ठल गावकर, श्री. झिपाजी परब, श्री. शंकर परब तसेच कृषी सखी श्रीमती सुचिता परब यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानत, शेतीशाळेत शिकविण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘गोकृपा अमृत’चा वापर स्वतःच्या भातशेतीत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार प्रदर्शन सहायक कृषी अधिकारी श्री. नागनाथ साखरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा