You are currently viewing ३१ मेपर्यंत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढा

३१ मेपर्यंत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढा

३१ मेपर्यंत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढा

महाडीबीटी २.० प्रणाली लागू होण्यापूर्वी समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाडिबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० कार्यान्वित होत असल्याने सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३१ मे २०२६ पर्यंत तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडिबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० सुरू होत असून, नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण सुरळीत व यशस्वी होण्यासाठी जुन्या प्रणालीतील सर्व प्रलंबित कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही प्रक्रिया

http://mahadbtmahait.gov.in

या संकेतस्थळावर सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी व पालकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज विद्यार्थी स्तरावर किंवा महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्यास ते ३१ मेपूर्वी निकाली काढणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना देखील विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा