You are currently viewing अस्वस्थ मनाचा गाभारा
Oplus_16908288

अस्वस्थ मनाचा गाभारा

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालीत्य साहित्य समूहाच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

अस्वस्थ मनाचा गाभारा

 

अथांग या काळजाच्या कोपऱ्यात

एक निवांत गाभारा अंधारलेला असतो

बाहेर जरी हास्याचा उत्सव असला

तरी आत एक कढ शांतपणे जळत असतो

भावनांच्या वादळात मग हा गाभारा

काहीसा अस्वस्थ काहीसा बेभान होतो

 

कितीही सजवले या चेहऱ्याचे खांब

तरी आतली वास्तू कधीकधी डगमगते

विचारांच्या जळमटाना दूर करताना

स्मृतींची जुनी पाने उगाच फडफडतात

हा अस्वस्थतेचा धूर मग हळूच

स्वप्नांच्या गगनचुंबी छताला स्पर्श करतो

 

सुखाचे मखमली पडदे कितीही लावावे

पण दुःखाचे एक वावटळ सगळं विस्कटून टाकते

मनाचा हा गाभारा मग नि:शब्द होऊन

काळाच्या पाऊलखुणा शांतपणे मोजत राहतो

 

तटस्थ राहून स्वतःच्याच कोलाहलात

तो एक नवा शोध घेत असतो

पण अस्वस्थता ही केवळ पोकळी नसते

ती तर एका नव्या सृजनाची नांदी असते

जसा हिरा पैलू पडताना सोसतो वेदना

तसेच हे मन संकटातून स्वतःला घडवत असते

 

हा गाभारा म्हणजे केवळ अंधार नाही

इथेच तर आत्मबोधाचा दिवा तेवत असतो

म्हणूनच या अस्वस्थतेला घाबरायचं कशाला..?

तिला तर अनुभवांचे सुवर्ण कोंदण करायचे

 

मनाचा गाभारा जरी आज व्याकुळ असला

तरी उद्या तिथेच समाधानाचे अमृत पेरायचे

या अस्वस्थ मनाच्या सुंदर गाभाऱ्यातून

एक प्रगल्भ, शांत आणि नवा

“मी” घडवायचा…..

 

सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

7066998796

प्रतिक्रिया व्यक्त करा