फोंडाघाटमध्ये इंधन पुरवठा सुरळीत
प्रतिभा आणि पोकळे पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल व CNG उपलब्ध; नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये
फोंडाघाट
फोंडाघाट परिसरात पेट्रोल, डिझेल तसेच CNG चा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणतीही घाबराट न बाळगता अनावश्यक इंधन साठा करू नये, असे आवाहन येथील पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आले आहे.
मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी थोडा प्रतीक्षा कालावधी जाणवत असला, तरी इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. फोंडाघाट येथील प्रतिभा पेट्रोल पंप तसेच पोकळे पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल आणि CNG नियमितपणे उपलब्ध होत आहे.
विशेष म्हणजे, रोज मोठ्या प्रमाणात CNG वाहनांची ये-जा सुरू असल्याने प्रतिभा पेट्रोल पंपाचे मालक प्रसाद वालावलकर स्वतः नियोजनात लक्ष घालत असून ग्राहकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच पोकळे पेट्रोल पंप व्यवस्थापनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सध्या मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असल्याने फोंडाघाट परिसरात वाहतुकीची गडबड वाढली आहे. मात्र दोन्ही पेट्रोल पंपांकडून योग्य नियोजन करण्यात येत असल्याने इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या परिस्थितीत योग्य नियोजन करून सेवा देणाऱ्या दोन्ही पेट्रोल पंप चालकांचे वाहनचालक व नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.
