शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढत सरकारविरोधात आवाज उठवला
कणकवली :
देशभरातील मेडिकल व्यावसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यातील मेडिकल व्यावसायिकांनीही प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व तालुक्यातील सर्व १७५ मेडिकल्स मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून ते बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, बुधवारी सकाळी कणकवली तालुक्यातील सर्व मेडिकल व्यावसायिक कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. यावेळी सर्व व्यावसायिकांनी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधल्या तसेच पांढरे कपडे परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला.
त्यानंतर सर्व मेडिकल व्यावसायिकांनी एकत्रित मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनात कणकवली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय घाडी यांच्यासह ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक बाळासाहेब डोरले, राजू मापसेकर, संजय पाध्ये, जिल्हा संचालक नंदू उबाळे, विवेक आपटे, मकरंद घळसासी, विजय घाडी, मुकुंद जाधव आदी मेडिकल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
