*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*रम्य ते बालपण*
बालपण हा शब्द उच्चारताच मन नकळत हसू लागते आणि आठवणींचा एक गोड झरा वाहू लागतो. आयुष्याच्या या टप्प्यातील प्रत्येक क्षण खरोखरच “रम्य” असतो. चिंता, ताण, स्पर्धा यांपासून पूर्णपणे मुक्त असलेला हा काळ म्हणजे आनंदाचा खजिनाच जणू…
बालपण म्हणजे मोकळं आकाश आणि उंच भरारी घेणारी स्वप्नं… त्या काळात आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्येही अपार आनंद शोधत असतो. पावसात भिजणं, चिखलात खेळणं, मित्रांसोबत लपंडाव, पकडापकडी, क्रिकेट खेळणं, लगोरी,
सायकलिंग हे सारे क्षण मनात कायमचे कोरलेले असतात. त्या खेळांमध्ये ना जिंकण्याची हाव असते ना हारण्याची खंत असतो तो फक्त आनंद…
शाळेचे दिवसही तितकेच संस्मरणीय असतात. पहिल्या बाकावर बसण्याची स्पर्धा, तासाला उशीर झाल्यावरची धडपड, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि कधी कधी मिळणारी रागावणी या सगळ्यांतूनच आपलं बालपण घडत असतं. शाळेतील मित्र हे तर त्या काळातील खरे खजिने असतात जे आयुष्यभर आपल्या सोबत आठवणींच्या रूपात राहतात…
आईच्या हातचे गरमागरम जेवण, वडिलांचे मायेने केलेले कौतुक, आजी-आजोबांच्या गोष्टी या सगळ्यांनी बालपण अधिकच गोड बनतं त्या
काळात आपल्याला मिळणारे प्रेम आणि जिव्हाळा हेच आपल्या आयुष्याचे खरे भांडवल असते…
आज आपण मोठे झालो आहोत अनेक जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि जीवनातील धावपळ यामुळे मन कधी कधी थकून जाते. अशा वेळी बालपणीच्या आठवणी म्हणजे एक गार वारा असतो जो मनाला शांत करतो आणि पुन्हा एकदा जगण्याची उमेद देतो.
खरंच बालपण हा आयुष्यातील असा सोनेरी काळ आहे जो परत कधीच येत नाही म्हणूनच त्या काळातील प्रत्येक क्षण मनापासून जगला पाहिजे आणि त्या आठवणी जपून ठेवल्या पाहिजेत.
“रम्य ते बालपण” हे फक्त शब्द नाहीत तर ती एक सुंदर भावना आहे… निरागसता, आनंद आणि प्रेमाने भरलेला हा काळ आयुष्यभर आपल्या हृदयात जिवंत राहतो
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
