*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता तिला तिचं बाईपण नकोसं झालंय*
बाईचं बाईपण तिच्या….
आईपणातच असत का?
तिला मन पण आहे
पण…. मन मारूनही
तिला जगता येत नाही.
घरला घरपण मिळाव म्हणून
तिने वारसाला जन्म द्यावा
आणि घराच्या आतच
तिने बंदीस्त रहावं
एव्हढ काय तिचं अस्तित्व….
आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या आत राहून
तिलाही मुक्त विचारांची
मोकळीक हवी असताना
एक स्त्री म्हणून किंबहुना
स्वतंत्र माणूस म्हणून
कुठला अधिकार दिलाय तिला
जगण्यासाठी!
बंधनाच्या बेड्या अडकवून
तिने उंबरठ्यावरच माप ओलांडून
नवगृह प्रवेश करावा
आणि त्या चार भिंतींच्या आड वेदनांना जन्म देऊन स्वतःला सुरक्षित ठेवायचं
तिच्या पाच दिवसांचा त्या शापित जगण्याच्या अवतीभवती
असंख्य प्रश्नचिन्ह पहारेकरी म्हणून
उभे असतात पण….
स्त्री होण्याच्या असहायतेवर
आपुलकीची फुंकर घालूनही
गारवा मिळत नाही
सहानुभूतीच्या कुशीत
तिला आपलेपण देताना
तिच्या देहाचा हक्क घेऊन
झोळीची दोरी तिच्या हातात दिल्यावर
आई होण्याचं बाईपण एव्हढच काय तिच्या वाटेला येतं
कारण तिचेच जन्मदाते
परक्याच धन समजून
तिला वाळीत टाकतात
म्हणून कुळाचार कुलधर्माच
पालण करण्यासाठी
तिला भोगाव्या लागतात
स्त्री होण्याच्या यातना
आता तिचं बाईपण तिला नकोस झालंय
कारणं….
त्या वंशावळीच्या झाडाच्या
फांदीवर
तिच्या ऐवजी तिनेच जन्माला घातलेल्या वारसदारच नाव लिहिलं जात
ती कंसात( ) सुध्दा नसते
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
