*श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयाची जनजागृती रॅली*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर):
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या संभाव्य तुटवड्याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, स्वदेशीचा स्वीकार आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. या राष्ट्रीय भावनेला प्रतिसाद देत माटुंगा येथील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना विभागातील विद्यार्थिनींनी जनजागृती रॅलीद्वारे सामाजिक संदेश दिला.
“इंधन वाचवा”, “स्वदेशी स्वीकारा”, “सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा” आणि “अनावश्यक परदेश प्रवास टाळा” अशा प्रभावी संदेशांचे फलक आणि बॅनर्स हातात घेऊन विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरातून महेश्वरी उद्यान, खालसा महाविद्यालय आणि डॉन बॉस्को शाळा परिसरापर्यंत जनजागृती फेरी काढली.
रॅलीदरम्यान विद्यार्थिनींनी नागरिकांमध्ये ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय जबाबदारी याविषयी जागरूकता निर्माण केली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी विद्यार्थिनींच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध सहभागामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्चना पत्की यांनी विद्यार्थिनींच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. शैक्षणिक प्रगतीसोबत विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुट्टीचा कालावधी असतानाही विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी रेखा शेलार, सोनी सिंह, केजल धनधुकिया, लेफ्टनंट सुवर्णा जोशी तसेच उपस्थित प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. जनजागृती रॅलीमध्ये एकूण ३० विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
