You are currently viewing ‘माणिक मोती’ संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माणिक वर्मांच्या अजरामर गीतांनी सावंतवाडी मंत्रमुग्ध

‘माणिक मोती’ संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माणिक वर्मांच्या अजरामर गीतांनी सावंतवाडी मंत्रमुग्ध

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते उद्घाटन; स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही

सावंतवाडी :

विदुषी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माणिक मोती’ या संगीत मैफिलीला सावंतवाडीत रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या सदाबहार गीतांचा सुरेल नजराणा सादर करण्यात आला.

राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी, “सावंतवाडीत आतापर्यंत १४ पर्यटन महोत्सव पार पडले असून त्यातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. नगरपरिषद ही लोकाभिमुख संस्था असून स्थानिक कलाकारांसाठी बॅ. नाथ पै सभागृह विनामोबदला उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी केली.

यास प्रतिसाद देताना नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी, “कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देणे आम्हाला निश्चितच आवडेल. स्थानिक कलावंतांसाठी नाथ पै सभागृहासह राजवाड्याच्या दरबार हॉलची दारेही खुली राहतील,” असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या गीतांची बहारदार मैफल रंगली. राग भटीयारसह विजय पताका, चांदण्या रात्रीतले, कौसल्येचा राम, त्या सावळ्या तनुचे, त्या चित्त चोरट्याला, मला मदन भासे हा, जाळी मंदी पिकली करवंद, घननिळा लडीवाळा, अमृताहूनी गोड आदी गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

ही गीते गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधीता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रृती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर आणि सानिका सासोलकर यांनी सादर केली. तर निरज भोसले, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री आणि भास्कर मेस्त्री यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले, तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी स्मितेश पंडीत यांनी सांभाळली. कार्यक्रमानिमित्त सर्व सादरकर्त्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी सदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, अभिनव संगीत विद्यालयाचे संचालक किरण सिद्धये, सुरश्री संगीत वर्ग संचालिका मंजिरी धोपेश्वरकर, रघुकूल स्वर विहार संचालिका नूतन परब, सोमा सावंत, संजय कात्रे, प्रतिष्ठानच्या मंगल भोसले, मानसी भोसले, प्राजक्ता भोसले, नमिता भोसले, अनिल भोसले, अण्णा देसाई, निरज भोसले, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रदीप शेवडे, रवींद्र गांवकर, शैलेश पै, गोविंद मळगावकर आणि सर्वेश राऊळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा