You are currently viewing तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात

तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात

तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात; संरक्षक कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली

दोडामार्ग

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तिलारी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला. ही घटना आज सकाळी घडली. सुदैवाने रस्त्याशेजारी असलेल्या संरक्षक कठड्यामुळे ट्रक थेट खोल दरीत कोसळण्यापासून बचावला आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक आज सकाळी तिलारी घाटातून खाली उतरत असताना घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणाचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक थेट रस्त्याकाठच्या संरक्षक कठड्याला धडकला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक दरीत कोसळला नाही आणि संभाव्य अनर्थ टळला.
अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. रस्त्याचा संपूर्ण भाग ट्रकने व्यापल्याने एसटी बस, मालवाहू ट्रक तसेच इतर मोठी वाहने अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, काही दुचाकीस्वारांनी अत्यंत सावधगिरी बाळगत अडथळ्यातून मार्ग काढत प्रवास सुरू ठेवला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अडकलेला ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा