*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित मदर्सडे निमित्त लघुलेख*
*आई*
आई..अगं एकच दिवस नाही…
तू सतत आमच्यासोबत आहे
नऊ महिने तुझ्या उबदार कुशीत
जन्माआधीच पालनपोषण केलंस…
कसं विसरणार…
पावडरतीट लावून दृष्ट काढून
तूच पाळण्यात घालायची..
अंगाई गायचीस…आणि मी परीच्या राज्यात प्रवेश करायची….
जेऊखाऊ घालून दोन वेण्या घालून सोबत डबा देत शाळेत पाठवणारी….परीक्षा ,स्पर्धेत नंबर
आला की कौतुकाचे हास्य मुखावर आणणारी…
कळीचं फूल झालं की बंधने नाहीत, पण नकळत संपूर्ण लक्ष ठेवणारी आई….
तुझ्यातील कला,साहित्याची आवड,गाणं कधी ऐकता वाचता भिनलं कळलंच नाही…तुझं घर सजवणं,देवपूजा,तुळशीजवळचा
सायंदीप…सगळं लख्ख मनात आहे….
सासरहून माहेरी आलं की,न सांगता तू कशी गं ओळखायची मनाच्या कथा,व्यथा…न बोलता न सांगताही काळजाला सारं कळे तुला…तुझ्या प्रेमसिंचनात न्हाऊन नव्या उमेदीनं सासरी निघायचे….
ऋतू बदलत गेले..हिरवी पाने पिवळी झाली….तशी एकेक गळायला लागली…
तू मनाची सकारात्मता,प्रसन्नता
कधी ढळू दिली नाहीस.मन भरून मुलं, जावई,नातवंडांचं कौतुक तुला उतारवयात सुखावत गेलं….
शेवटी शेवटी फोनवर कसे आहात सगळे….
आम्ही ठीक….आहोत…
सुखी रहा बेटा…म्हणत फोन ठेवायची…
तुझे ते सुखी रहा शब्द किती आश्वासक वाटत,आजही तू नाहीस असं वाटतच नाही..कारण सुखी रहा.…तुझे शब्द आजही कानाशी गुंजतच आहेत आई….!!
तू आहेस जवळच,आमच्या आसपासच….!!
सदैव खंबीर ठेवायला…!!
००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
