You are currently viewing पाणी आणि काठी

पाणी आणि काठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*पाणी आणि काठी*

 

ती तिच्याबद्दल फार कडवटपणे बोलत होती. ती जिच्याबद्दल बोलत होती ती माझी अगदी जीवाभावाची बालमैत्रिण होती. आम्ही एकत्र वाढलो होतो, एकत्र घडलो होतो त्यामुळे ती जे काही मला सांगत होती ते खरं म्हणजे मला पटतही नव्हतं आणि ऐकवतही नव्हतं. गंमत म्हणजे सांगणारी “ती” मैत्रिणीची सूनच होती. काही व्यावसायिक निमित्ताने माझ्या मैत्रिणीचा मुलगा आणि सून जळगावला आले होते. दोन दिवस त्यांचा मुक्काम होता. मजेत होते दोघे. त्यांना माझ्या ऐसपैस बंगल्यातलं वास्तव्य खूप आवडत होतं. या दोन दिवसात आम्ही निवांतपणे खूप गप्पाही केल्या.

 

पण मग त्या गप्पांना कडवट वळण कधी आणि कसे लागले ते कळलंच नाही. माझी मैत्रीण एक मोठी एंटरप्रायझर होती पण तेव्हा ती विवंचनेत होती. कुठल्यातरी व्यवहारात तिची प्रचंड फसवणूक झाली होती आणि परिणामी भल्या मोठ्या रकमेचा परतावा तिला करावा लागणार होता.तिच्यावर पोलीस केसही होऊ शकत होती. त्या संबंधात तिची सून बोलता बोलता म्हणाली,” मावशी, आईंना की नाही व्यवहार ज्ञानच नाही. एक तर कुठे काय बोलावं तेही कळत नाही. धंद्याची गुपितं कुणी कुणाला सांगतं का? समोरचा माणूस ओळखण्याचं कसब त्यांच्यात नाही. तशा भोळ्या आहेत त्याशिवाय इतकं झालंय ना तरी खर्चाचा हात काहीच आवरत नाही बरं का? नातेवाईकांना भले मोठे आहेर करणार, सण सोहळ्याचा थाट तर विचारूच नका. हे म्हणजे कसं आहे ना ऋण काढायचे पण सण साजरे करायचेच.”

 

माझ्या मैत्रिणीचा मुलगा मात्र काहीच बोलत नव्हता याचा अर्थ बायकोचं बोलणं त्यालाही पटत होतं का?

ही मात्र बोलतच होती. “आईंच्या या कर्जापायी पुढच्या सात पिढ्या संकटात येणार हे मात्र नक्की!”

 

मला काय बोलावं ते कळत नव्हतं. शिवाय विषय संपवता संपवता ती म्हणाली मात्र,” जाऊदे! जे झालं ते झालं! शेवटी काय यातून त्यांना बाहेर काढणं हे तर आमचंच कर्तव्य आहे ना? आणि ते आम्ही निभावूच.”

मी शांतपणे ऐकत होते. मैत्रिणीच्या सुनेचं वाक्चातुर्य अफाट होतं. शिवाय या साऱ्या बोलण्यामुळे तिची प्रतिमा कुठेही बिघडत नव्हती हेही तितकच खरं. त्यावेळी मला एक क्षणभर वाटूनच गेलं की “ज्या अर्थी ही इतकं सांगते त्या अर्थी माझ्या मैत्रिणीची काहीतरी चूक असणारच.”

पण मी मात्र तेव्हा काहीच प्रतिक्रिया नोंदवली नाही हा माझा वेडेपणा होता का? असो.

जाताना दोघेही आनंदाने परतले. “मावशी किती छान वाटलं तुमच्याकडे! पण हे बघा आपल्यात झालेलं बोलणं आईंना चुकूनही कळू देऊ नका हं! जाऊ दे! होईल सगळं नीट. आम्ही करूच नीट.”

तिचा, “आपल्यातलं बोलणं” हा शब्द मला खटकला होताच. मी तर काहीच बोलले नव्हते.

पुढचा धक्का प्रचंड होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती.

सात आठ दिवसांनी माझ्या मैत्रिणीचे पत्र आले. मायना नसलेले. सुरुवातीला “प्रिय” नाही शेवटी “तुझीच” हे पण नाही. फक्त एक तिखट मजकूर.

 

“तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. प्रथमच माझी सून तुझ्याकडे आली होती. किती विश्वासाने आणि तू चक्क तिला मी कशी उधळी आहे, ऋण काढून सण साजरे करते, कुठे काय बोलावं हे मला कळत नाही असं काहीबाही सांगत सुटलीस? गमतीने असेल पण तिला नाही आवडलं ते! माझं आणि तिचं नातं इतकं प्रेमाचं आहे की तिला तुझं बोलणं रुचलं तर नाहीच पण ती खूप दुखावली आहे. म्हणाली,” परत मी मावशीकडे कधीच जाणार नाही.”

आकाश कोसळलं माझ्यावर. असा मी काय गुन्हा केला होता की तिचं ऐकून घेण्याचा फक्त वेडेपणा केला होता!

 

मध्यरात्री उठून मी माझ्या प्रिय, जीवाभावाच्या मैत्रिणीला पत्र लिहायला घेतले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. पेन, कागद काढून घेतले.” आता हा दुसरा वेडेपणा करू नकोस. विषय वाढवू नकोस. त्यांची नाती बिघडवू नकोस.”

“मग तिला खरं कसं कळेल?”

“न का कळेना. ती तुझी खरी मैत्रीण असेल तर ती तुला क्षमा करेल. पुन्हा तुझ्या गळाभेटी येईलच.”

“मला क्षमा? कशाची? मी न केलेल्या गुन्ह्याची?

पण तरीही मी नवऱ्याचेच ऐकले. हाही वेडेपणाच आहे असं वाटत असतानाही.

 

पण काळाने मात्र सिद्ध केले. अखंड पाण्यावर काठीने मारलेला फटका पाणी फाडत नाही. ते कायमच एकसंघ राहतं.

 

*राधिका भांडारकर*.

प्रतिक्रिया व्यक्त करा