“जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन” विषयावर १२ मे रोजी सावंतवाडीत परिसंवादाचे आयोजन
वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार; संजय सावंत व भाग्यश्री परब यांचा सत्कार
सावंतवाडी
शासनातर्फे पुढील तीन वर्षांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले वन्यजीव तज्ज्ञ श्री संजय सावंत (तिलारी, दोडामार्ग) तसेच पक्षीतज्ज्ञ श्रीमती भाग्यश्री परब (रानबांबूळी) यांचा सत्कार समारंभ मंगळवार, दि.१२ मे रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानिमित्त “जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील वाढते पर्यावरणीय प्रश्न आणि वन्यजीव संवर्धन यावर सखोल चर्चा होणार आहे.
मानव-वन्यजीव संघर्षावर होणार मंथन
हत्ती, गवेरेडे, बिबटे, माकडं, सांबर आदी वन्यप्राण्यांमुळे निर्माण होणारा मानव-वन्यजीव संघर्ष, दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह गावे, तसेच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग या विषयांवर परिसंवादात विस्तृत मंथन करण्यात येणार आहे.
पर्यावरण बाधक प्रकल्पांवरही चर्चा
याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले व्हिला प्रकल्प, शेकडो एकर जमिनीवरील वृक्षतोड, जागोजागी सुरू असलेले क्रशर्स व क्वारीज्, मालवण-कुडाळ परिसरातील अवैध वाळूउपसा तसेच मळेवाड, आजगाव, धाकोरे परिसरातील प्रस्तावित नऊ गावांतील मायनिंग प्रकल्प या पर्यावरण बाधक विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या कार्यक्रमास पत्रकार, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.
