You are currently viewing नांदगाव ओटव फाट्यावर भीषण अपघात

नांदगाव ओटव फाट्यावर भीषण अपघात

नांदगाव ओटव फाट्यावर भीषण अपघात

कुत्रा आडवा आल्याने कार उड्डाणपुलाच्या भिंतीवर धडकली; विक्रोळीतील महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा येथे शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात विक्रोळी येथील मीरा सचिन सावंत (वय ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चालक सचिन भास्कर सावंत (५०) आणि त्यांची पुतणी सानिका समीर सावंत (२४, रा. वसई) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथील सावंत कुटुंब आपल्या खाजगी कारने सिंधुदुर्गातील हिर्लोक-वेताळ बांबर्डे येथे जाण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईहून रवाना झाले होते. शनिवारी सकाळी नांदगाव ओटव फाटा येथे आल्यानंतर अचानक एक कुत्रा कारसमोर आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीवर जोरदार आदळली.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना कारमधून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा