You are currently viewing नागरिकांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

नागरिकांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे मालवण येथे आयोजन*

*शिबिरामध्ये १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध*

 

सिंधुदुर्गनगरी :

नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावीत, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले तत्काळ मिळावेत तसेच जमिनीच्या नोंदी, फेरफार, वारस नोंदी यासारख्या प्रलंबित प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे आणि नागरिकांना शासनाच्या सोयी-सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

मालवण नगरपालिका व मालवण महसुली मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरातील रघुनाथ देसाई तालुका स्कुल सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर, तहसिलदार गणेश लव्हे, उपसभापती शाम झाड, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महसूल, कृषी, आरोग्य, महावितरण, संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.

शिबिरामध्ये १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यात ७/१२ व फेरफार उतारे, पीकपाणी नोंदी, ई-फेरफार सेवा, वारस नोंद, नाव दुरुस्ती, उत्पन्न व रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र, तसेच विविध प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तहसिलदार गणेश लव्हे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित नागरिक लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध शासन निर्णय जसे की शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे, जनगणना, निवडणूक आयोगाचा SIR कार्यक्रम, आंबा व काजू नुकसान पंचनामे या सर्व कामकाजामध्ये प्रशासनाला लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते घरकुल प्रमाणपत्र, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणेबाबतचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १५५ अंतर्गत चे आदेश, शिधापत्रिका, सातबारा इत्यादी विविध प्रकारचे दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्या-त्या क्षेत्रातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित संबंधित विभागांच्या अधिका-यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवलीचे सरपंच शाम वाक्कर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा