*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख*
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ०६ मे हा स्मृतीदिन (पुण्यतिथी) संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक म्हणून आदरपूर्वक पाळला जातो. त्यांना विनम्र अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा थोडा आढावा घेऊया.
प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अनमोल कार्य केले होते. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते.
शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. त्यांनी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा विविध गोष्टींसाठी पाठिंबा देऊन समाज सुधारणा केल्या.
शाहूजी महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी चित्पावन ब्राह्मणांच्या तीव्र विरोध असून सूद्धा आपल्या राज्यात दलित-मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. म्हणूनच शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते.
शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जाते. त्यांनी समाजातील अनेक रुढी, परंपरा नष्ट केल्या. यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्म दिवस हा 2006 पासून “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, स्त्री पुनर्विवाह कायदा, आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता.
शाहू महाराजांनी समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी अनमोल कार्य केले. त्यांनी संस्थानातील सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरात भररस्त्यावर हाॅटेल घालून दिले. शाहू महाराज सर्व जातीतील लोकांबरोबर हॉटेलमध्ये चहा घेत असत. यावरून त्यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य लक्षात येते.
शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. त्या काळात शिक्षणात ब्राम्हणांची मत्तेदारी होती. बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. १९१७ साली शिक्षण सर्वांसाठीच मोफत आणि सक्तीचे केले. संस्थानात विविध जातीधमांतील विद्यार्थ्यांसाठी बावीस वसतिगृहे उभारली. खेडोपाडी शाळा उभारल्या. विविध क्षेत्रांतील होतकरू, हुशार व्यक्तींना, कलाकारांना प्रोत्साहन, पाठबळ दिले. कोल्हापूर संस्थानाबाहेरील विविध शैक्षणिक संस्थांनाही पाठबळ देऊन ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.
*शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची खास योजना*
दर्जेदार शिक्षण द्यायचे झाल्यास शिक्षक वर्गही तितकाच गुणवान असावा, या हेतूने शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची खास योजना महाराजांनी १९११ साली सुरू केली. ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवले नाही व जे मराठी स्कूल फायनल परीक्षा किंवा विद्यापीठाची एखादी परीक्षा पास झाले नसतील, तसेच ज्यांचे वय ४० पेक्षा कमी असेल अशा शिक्षकांनी दोन वर्षांत व मुलकी परीक्षा पास होणे महाराजांनी बंधनकारक केले. जे शिक्षक पास होणार नाहीत, त्यांना बढती नाही, असा सक्त आदेश महाराजांनी दिला होता. त्याचबरोबर जे शिक्षक या परीक्षेला बसण्यास तयार होतील, अशा शिक्षकांना तीन महिन्यांची स्पेशल रजा मंजूर करण्यात येईल, असा आदेशही दिला होता. शाहू महाराजांचा हा विचार तत्कालीन परिस्थितीचा विचार करता किती महत्त्वाचा होता हे लक्षात येईल. शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची असल्यास व अशा विद्यार्थ्यांना शाळेची फी भरण्याचे सामर्थ्य नसल्यास त्यांना फी माफ करून शाळेत घेण्याच्या सक्त सूचनाही महाराजांनी दिल्या होत्या.
*मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी*
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण त्या काळात अत्यल्प होते. अशा वेळी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी राजकन्या अक्कासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी नंदकुंवर यांच्या नावाने विशेष शिष्यवृत्ती जाहीर केल्या. मुलींच्या स्वतंत्र शाळा नसलेल्या ठिकाणी मुलांच्या शाळेत मुली पास झाल्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांना बक्षिसे जाहीर करणारा हा एकमेव द्रष्टा राजा. जुने अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल (सध्याचे सीपीआर) या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरुवात करून तो पूर्ण करणाऱ्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. शैक्षणिक क्षेत्रातील धोरणात्मक बदलांना अनुसरूनच शाहू महाराजांनी १९१३ मध्ये कोडोली येथील शाळेतील मुख्याध्यापक गोविंद बळवंत कुंभोजकर यांच्यामार्फत ‘कोल्हापूर इलाख्यातील सर्व शाळांचे मास्तर यांचे वहिवाटीकरिता नियम’ असे एक परिपत्रक तयार करून घेतले. हे नियम सध्याचे तथाकथित शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी यांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहेत. शिक्षकांनी कसे काम करावे, शाळेची व्यवस्था कशी असावी,शिक्षकांचे वर्तन कसे असावे, याबाबत विस्तृत नियमावली या परिपत्रकात दिसून येते.या नियमांत शिक्षकांना शाळा मास्तराचे काम करताना मुख्यत्यारी, वकिली, दुकानदारी व धंदा करण्यास मनाई आहे; परंतु पोस्टाचे वा म्युनिसिपालिटीचे काम करण्यास हरकत नाही, पण ही कामेही शाळेच्या वेळेत करण्यास मनाई होती.
*फी माफी बाबत*
मुलींकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये,मागास जातीच्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ अशी नियमावली, शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी खासकरून महाराजांनी करून घेतली.
पुढे १९१७ साली महाराजांनी सर्वांनाच शिक्षण मोफत परंतु, सक्तीचे करण्याचा कायदा केला. या कायद्याने शिक्षणक्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. हा कायदा म्हणजे तत्कालीन काळाची गरज होती. शाहू महाराजांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. पण, एकाचवेळी इतक्या इमारती उभारणे शक्य नसल्याने गावातील मंदिरात, चावडीच्या इमारतीत शाळेची सोय करण्यात आली. शाळेत मुलांना न पाठवणाऱ्या पालकांना दंड करण्याची तरतूद करण्यात आली. बहुतांश पालक हा शेतकरीवर्गातील असल्याने त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करवून घेतला. तत्कालीन ब्रिटिश इलाख्यात कोणत्याही राज्यकर्त्याने केले नसेल इतके बजेट म्हणजे सुमारे १ लाख रुपये शिक्षण खात्यासाठी महाराजांनी स्वतंत्र राखून ठेवले. या बजेटमधील रक्कम शिल्लक राहिल्यास ती इतरत्र न खर्च न करता फक्त शैक्षणिक बाबींसाठीच खर्च करावी, असा महाराजांचा स्पष्ट आदेश होता.
शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक क्षेत्रात महाराजांनी केलेले हे कार्य म्हणजे खरोखरच एक क्रांती होती. या कायद्याची अंमलबजावणी इ.स.१९१७ पासून सुरू केली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती जाहीर केल्या. त्याचप्रमाणे महाराज स्त्रियांच्या शिक्षणासाठीही आग्रही होते. त्यांनी संस्थानात खास मुलींच्या स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. दरबाराने हुशार मुलींसाठी शिष्यवृत्ती ठेवल्या होत्या. राजाराम काॅलेजातीलतील सर्व मुलींना शिक्षण मोफत केले होते.
*व्यावसायिक शिक्षणावर भर*
व्यावसायिक शिक्षणाकडेही महाराजांनी लक्ष दिले. खेडेगावचा कारभार व्यवस्थित चालविता यावा यासाठी त्यांनी पाटील व तलाठी शाळा चालू केल्या. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र चालू केले. तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था स्थापन केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाई. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी ‘इन्फंट्री स्कूल’ सुरू केले.
शाहू महाराजांनी सर्व स्तरातील जनतेच्या उद्धारासाठी कार्य केले. महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे घेउन जाण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. महाराज फक्त बोलत नव्हते, तर ते कृतीशील समाज सुधारक होते.’बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या तुकाराम महाराजांच्या ओळी शाहू महाराजांना तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या प्रती सामान्य जनतेत खूप जिव्हाळा होता. महाराजांचे कार्य शब्दांतून मांडणे शक्य नाही. एक आदर्श राजा, बहुजन आणि दलित समाजाचे नेते म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम टिकली. दिनांक ६ मे १९२२ रोजी महाराज आपल्या जनतेला कायमचे पोरके करून निघून गेले. पण त्यांच्या कार्यातून ते अजरामर झाले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले.
आपल्या देशातली आजची शिक्षण व्यवस्थापन व सर्व क्षेत्रातले कारोबार पाहताना असे वाटते की, छत्रपती राजे शिवबा आणि राजर्षी शाहू महाराजांनी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा.
छ्त्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏🙏🌹
शोभा वागळे
पुणे.
8850466717
