“केवळ दिखाव्यासाठी काम नको”; रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना
वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला. “केवळ दिखाव्यासाठी काम करून चालणार नाही. आरोग्य विभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून प्रत्येकाने गांभीर्याने काम केले पाहिजे. कोणाचीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
येथील पंचायत समिती सभागृहात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवन राऊत, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. समीर पोटे आदी उपस्थित होते.
बैठकीत अभियानाचा गावनिहाय आढावा घेत सभापती रावराणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी केली. “या अभियानांतर्गत आपला तालुका सरस ठरवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. पुढील पाच वर्षांत विविध अभियानांतून तालुक्याला बक्षिसे मिळवायची आहेत,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, तालुक्यातील आरोग्य सेविकांची रिक्त पदे हा मुद्दा बैठकीत चर्चेचा विषय ठरला. यावरून सभापती रावराणे यांनी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक आनंदा चव्हाण यांना धारेवर धरले. “गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाच्या हाती सत्ता असताना ही रिक्त पदे का भरली गेली नाहीत? दरमहा जिल्हास्तरावर होणाऱ्या आढावा बैठका केवळ खर्चाच्या बिलांसाठीच घेतल्या जातात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील आरोग्य सेविकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
