सिंधुदुर्गात पर्यटन जिल्हा योजनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
कुडाळ
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या वतीने आयोजित ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ कुडाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. रविवार, दिनांक १० मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५ या वेळेत जय वासुदेवानंद हॉल (आर.एस.एन. हॉटेल शेजारी, उद्यमनगर) येथे हे भव्य संमेलन पार पडणार आहे.
तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी २०१९ रोजी ‘सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले होते. त्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ आणि सिंधुदुर्गच्या समृद्ध निसर्गसंपदेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मा. सौ. निलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुयोग धस (आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित) असतील.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयराजजी नायर, अॅड. मनोज आचरे (राष्ट्रीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) आणि अभिमन्यु पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री उदय सामंत, गणेश नाईक, दीपक केसरकर, नितेश राणे, वैभव नाईक यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी रुपी धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मनीषा टाककर आणि कोकणातील अनेक माजी आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशी भव्य ‘वृक्षदिंडी’ने होईल. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता दीपप्रज्वलन व उद्घाटन समारंभ, तर १०:३० वाजता शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. दुसऱ्या सत्रात विशेष अतिथींची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमींचा गौरव (पुरस्कार वितरण सोहळा) आयोजित करण्यात आला आहे.
या संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरणप्रेमी, प्राणीमित्र, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
