You are currently viewing 30 जूनपूर्वी ऑनलाइन हयात दाखला अनिवार्य; अन्यथा अर्थसाहाय्य थांबण्याची शक्यता

30 जूनपूर्वी ऑनलाइन हयात दाखला अनिवार्य; अन्यथा अर्थसाहाय्य थांबण्याची शक्यता

30 जूनपूर्वी ऑनलाइन हयात दाखला अनिवार्य; अन्यथा अर्थसाहाय्य थांबण्याची शक्यता

संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना राजेंद्र मसुरकर यांचे आवाहन

सावंतवाडी

महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अर्थसाहाय्य योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी योजना, विधवा, अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर तसेच 18 वर्षांखालील अनाथ मुले आणि वृद्धापकाळ अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन हयात दाखला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून बीएसए (Beneficiary Satyapan App) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.
राजेंद्र मसुरकर यांनी सांगितले की, 15 जूननंतरच्या शासन निर्णयानुसार यापूर्वी 1 एप्रिलपासून तलाठीमार्फत ऑफलाइन हयात दाखला दिलेल्या लाभार्थ्यांनाही आता नव्याने ऑनलाइन हयात दाखला सादर करावा लागणार आहे. हा दाखला 30 जून 2026 पर्यंत देणे बंधनकारक असून, तसे न केल्यास संबंधित लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यात शासनाचे अर्थसाहाय्य जमा होणार नाही.
सेतू केंद्र किंवा तलाठी कार्यालयात सुविधा उपलब्ध
लाभार्थ्यांनी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र अथवा तलाठी कार्यालयामार्फत ऑनलाइन हयात दाखला सादर करावा. वयोवृद्ध, अंथरुणाला खिळलेले, अंध, अपंग, मूकबधिर आणि कर्णबधिर व्यक्तींसाठी कोतवालामार्फत घरी जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
या प्रक्रियेसाठी शासनाने 50 रुपये शुल्क निश्चित केले आहे. लाभार्थ्यांनी केंद्रावर जाताना आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल, बँक किंवा पोस्टाचे पासबुक तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाने दिलेले क्यूआर कोड असलेले ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे. केंद्रावर लाभार्थ्याचा चेहरा (फेस रीडिंग) संगणकाद्वारे पडताळण्यात येणार आहे.
20 जूननंतर बीएसए अॅप कार्यान्वित
शासनाचे Beneficiary Satyapan App (BSA App) 20 जूननंतर कार्यान्वित होणार असून, याच माध्यमातून लाभार्थ्यांचे सत्यापन केले जाणार आहे. दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात दाखला सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला दर पाच वर्षांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे आवाहन
सामाजिक कार्यकर्ते, बचत गट, सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. गरजू लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही ईश्वरी सेवा असल्याची भावना ठेवून जनजागृती करण्याचे आवाहन राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.
महत्त्वाचे
ऑनलाइन हयात दाखला देण्याची अंतिम मुदत : 30 जून 2026
ऑफलाइन दाखला दिलेल्यांनाही ऑनलाइन दाखला आवश्यक
बीएसए (Beneficiary Satyapan App) द्वारे सत्यापन
दाखला न दिल्यास अर्थसाहाय्य बंद होण्याची शक्यता
सेतू, महा-ई-सेवा केंद्र व तलाठी कार्यालयात सुविधा उपलब्ध
अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर (सावंतवाडी) यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा