दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी हयातीचे दाखले सादर करावेत
सिंधुदुर्ग नगरी
जिल्ह्यातील दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग येथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून दरमहा अनुदान अदा करण्यात येते. लाभार्थी ह्या वयोवृद्ध असल्याने शासनाच्या नियमानुसार वर्षातून प्रत्येक सहा महिन्याने (३१ मे व ३० नोव्हेंबर) हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत. जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून एकूण 33 लाभार्थ्यांनी दरमाह अनुदान अदा करण्यात येते. तरी दुसऱ्या महायुद्धातील पात्र माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक/ सरपंच /ग्रामसेवक यांच्याकडून सही व शिक्यासह प्राप्त करून घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र बँक पासबुकच्या छायांकित प्रतिसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दि. ३० मे २०२६ पर्यंत सादर करावेत. सदर दाखले दिलेल्या मुदतीत प्राप्त न झाल्यास दिनांक १ जून २०२६ पासून मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० / ९८३४४६५९०४ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
