११ मे रोजी मंदिरात पारंपरिक हापूस सजावट
देवगड (प्रतिनिधी):
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या कुणकेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे ११ मे रोजी देवगड हापूसची आकर्षक आरास करण्यात येते. यंदा या परंपरेला नव्या स्वरूपात साजरे करत ‘आंबा महोत्सव २०२६’ चे आयोजन १० ते १२ मे या कालावधीत करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी मंदिर परिसरात हा मुख्य उत्सव पार पडणार असून, भाविक व पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. मंदिराच्या पवित्र वातावरणात दरवळणाऱ्या हापूस आंब्याच्या सुवासाने हा उत्सव भक्ती आणि आनंदाचा संगम घडवणार आहे.
महोत्सवानिमित्त मंदिर गाभारा व परिसरात हापूस आंब्यांची देखणी सजावट करण्यात येणार आहे. याशिवाय विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन व विक्री, आंब्यावर आधारित विविध खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी, तसेच आंब्याच्या रोपांचे प्रदर्शन व विक्री असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव अधिक व्यापक करण्यात आला आहे. गावातील आंबा उत्पादकांनी स्वच्छ व दर्जेदार आंब्यांची उपलब्धता करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विशेष म्हणजे, रविवार दि. १० मे ते मंगळवार दि. १२ मे २०२६ या कालावधीत मंदिर परिसरात विविध स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत. इच्छुकांसाठी गुरुवार दि. ७ मे २०२६ पर्यंत स्टॉल बुकिंग सुरू राहणार आहे.
या महोत्सवामुळे कुणकेश्वर परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. धार्मिकता, निसर्गसौंदर्य आणि कोकणातील आंबा संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविक व पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ७७००९९७५७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
