आजकाल सगळीकडेचं माणसांच्या झुंडी आपल्याला पहायला मिळतात. राजकीय क्षेञात त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.माञ या माणसांतील झुंडीमध्ये हरवलेली संवेदनशीलता,माणूसकी आणि ” माणूस” सापडणे दुर्मिळ. पण साधारण सोळा वर्षांपूर्वी मला असा एक माणूस सापडला.माणूस कधीच परिपूर्ण नसतो.पौर्णिमेच्या चंद्रावरही एखादा काळा टिपका असतो.कधी तो स्पष्ट दिसतो तर कधी अस्पष्ट.
निरपेक्ष भावनेने कष्ट करणाऱ्यांच्या आणि निष्ठेने काम करणार्यांच्या हाताला अनेकदा फोड येतात पण त्या वेदना संयमाने सहन केल्या की एक दिवस भाग्याच्या रेषा सहजपणे उमटतात आणि त्याची गोड फळे चाखायला मिळतात,अर्थात हे माझे भाष्य आहे ते काल परवाच तब्बल सुमारे बारा वर्षांचा राजकीय वनवास संपवून महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात जे आता प्रवेश करणार आहेत ते माझे सन्मित्र मा.प्रमोद जठार.
२००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणूकीत मी त्यांचा एक मित्र म्हणून सक्रिय होतो.त्यामुळे या माणसांतील माणूस अगदी जवळून अनुभवता आला.२००९ ची निवडणूक हे फार मोठ्ठे आव्हान..आणि हे आव्हान होते काँग्रेसचे तत्कालीन जांबाज नेते आणि जिल्ह्याचे पालकमंञी मा.नारायणराव राणे यांचे.राणेसाहेबाना टक्कर देणे हे काही सोपे काम मुळीच नव्हते.त्यावेळची भाजपाची सोसो ताकद आणि समोर रविंद्र फाटकांसारखे दादांचे उमेदवार.राजकारणाची बाराखडी सिंधुदुर्गात पहिल्यांदा शिकायला आलेल्या जठारानीं अनेक वर्षांचा स्व.आप्पासाहेब गोगटे यांचा गड राखला.अवघ्या चौतीस मतानी ते जिंकले खरे पण काही कारणांमुळे त्याना किंवा त्यांच्या कुटुंबियांना जठार आमदार झाल्याचा आनंद साजरा करता आला नाही.त्याच्यावर आरोप झाल्याने त्यानां आनंद साजरा करण्या ऐवजी न्यायालयीन प्रक्रियेला काही महिने सामोरे जावे लागले.यावेळी मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान जिल्हा संघचालक मा.श्री अरविंद कुडतरकर दोघांनीही त्यांच्यासाठी खिंड लढवली.या वेळी जठार व त्यांच्या कुटुंबियांनी जो मानसिक ञास सहन केला ते पहाता त्यानां निश्चितच स्व.अजितदादांचे बोल किती खरे होते याची आठवण झाली असेल.दादा म्हणाले होते,” राजकारण लय वंगाळ हाय”
दुसर्या निवडणुकीत जठार पराभूत झाले.ते पराभूत होणारचं होते.याला अनेक कारणे आहेत.त्या अनुषंगाने एक किस्सा सांगणे आवश्यक आहे. जि.प.गटात एका कार्यकर्त्यांवर आर्थिक नियोजनाची व इतर जबाबदारी देण्यात आली होती.त्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मी आणि जठारानां मदत करण्यासाठी खास मुंबईहून आलेली जठारांची मानस भगिनी असलेली जी मुंबईत वकिली व्यवसाय करते ती ,आम्ही दोघेही त्या मतदारसंघात गेलो.दिवसभर फिरून आढावा घेतला तर जठारांच्या प्रचाराचा तेथे मागमूसही नव्हता.उलट नितेशजी राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे अतिशय सूक्ष्म नियोजन होते.त्या ताई मला म्हणाल्या ही गोष्ट प्रमोददादाच्या कानावर घातली पाहिजे,आठ दिवस मतदानालां असताना जर ही परिस्थिती असेल तर आपण कसे जिंकणार ? त्या बिचार्यानी हा विषय सांगितला तर जठारचं तिच्यावर ओरडले तिला म्हणाले, ” आपण असं काही सांगू नका,उगाच आमच्यात आपापसात वाद नको” ती बिचारी डोळे पुसत बाहेर आली.पण जठारानां आपली चुकं समजली आणि त्यानी तिला स्वारी म्हणाले. ..शेवटी जठार पराभूत झाले.
राजकारणात हल्ली चुगलीखोरांचा एक नवीन वर्ग तयार झालेला आहे.अशा अकार्यक्षम चुगलीखोरांच्या नादाला लागून अनेक नेते अडचणीत आलेले आहेत..पण प्रमोद जठार हा असा राजकीय नेता आहे की कुणीही कुणाबद्दल काहीही सांगितले तरी त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता जे चुगली करतात त्यांच्यावरही प्रेम करतात आणि ज्यांच्याबद्दल चुकली केलेली असेल त्यानाही गोंजारतात आणि जे मनात आहे ते कधीही हा माणूस चेहर्यावर आणत नाही.यावरून मला गौतम बुद्धाचे विचार आठवले,बुद्धांची शिकवण अशी होती,कोणी काही सांगेल,म्हणून विश्वास ठेवू नका.उद्या मी सुध्दा जे सांगेन त्यावर पण विश्वास ठेवू नका..कारण जो कुणी सांगतो ते मुळीच अंतीम नसतं.देवऋषी नारदमुनी हा पण कळलाव्या होता पण त्याचा उद्देश स्वच्छ होता.
२०१४ ते २०२५ हा काळ जठारांसाठी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाचा होता.ते थांबले नाहीत. आपल्या क्षमतेनुसार ते काम करत राहिले.त्यानां एक माहित होतं ज्यांच्या नशिबात संघर्षाचे उन असते त्यांच्याच नशिबात पौर्णिमेचे शितल चांदणे असते.ज्याच्यात अंगावर येणारी वादळं परतवून टाकण्याची क्षमता असते तो परिस्थितीला किंवा इतरानां दोष देवून कधीच थांबत नाही.
त्यांच्या बरोबर काम करत असताना अशा अनेक घटना आहेत की ज्यामधून त्यांच्यातील संवेदनशील माणूस मी अनुभवलेला आहे.कळणे मायनिंगचा संघर्ष सर्वानीच पाहिला.ज्यामध्ये एक पर्यावरण प्रेमी म्हणून मी पण सक्रिय होतो.त्या आंदोलनात एका सुरक्षा रक्षकाचा बळी गेला.ज्यात मायनिंगला विरोध करणार्यां सात आठ कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले.त्यानां सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले.जठार त्यांच्या कुटुंबियानां भेटण्यासाठी कळणे येथे आले.तेव्हा त्या सात जगात एक आरोपी अतिशय गरीब होता.आईवडील वयस्कर. कमावणारा मुलगा जेलमध्ये.ही गोष्ट जेव्हा जठारानां समजली तेव्हा तिथल्या तेथे त्यानी भरीव आर्थिक मदत केली.दुसरा एक किस्सा सावंतवाडीतील एका जेष्ठ संघ स्वयंसेवकाचा.जे आणीबाणीत बारा महिने जेलमध्ये होते.आजारी पडले व अंथरूणाला खिळलेले होते.त्यांच्या सौ.मला बाजारात भेटल्या..डोळ्यात पाणी आणून मला म्हणाल्या,बघा काही मदत होते का? औषधोपचारा साठी पण पैसे नाहीत. मी लागलीच जठाराना फोन केला.त्यानी लागलीच आर्थिक मदत पाठवली.ज्याना मदत केली ते बिचारे आज हयात नाहीत.
मुंबईत जठारांच्या जीवाला जीव देणारे अनेक निरपेक्ष भावनेने काम करणारे जिवाभावाचे मित्र जोडलेले आहेत.संजय फाळके,संजय कुदळे,संदीप राणे,प्रभाकर पवार,सुनील खाडे,सुधीर देवळेकर,अमित चिटणीस, रवि करमरकर आणि जठारांसोबत सतत त्यांची सावली बनून सोबत असलेले नरेंद्र सिंग.हे खरे तर जठारांचे एक कुटुंबच आहे.
जठारानी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले.ना वारसा,ना वशिला फक्त कामात सातत्य, श्रध्दा व सबुरी यामुळेच पक्षनेतृत्वाने जठारानां आमदारकी बहाल केली.
महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात एक अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या कथा आणि व्यथा मांडणारा एक हक्काचा आमदार भारतीय जनता पक्षाने दिला.जठारांचे वाचन प्रचंड आहे.महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा इतिहास, भूगोल अगदी तोंडपाठ. मागच्या महिन्यात संगमेश्वर येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.कार्यक्रम संपल्यानंतर संभाजी महाराजांच्या प्रस्थावीत स्मारकाला तेथील रहिवासी श्री सरदेसाई यांच्या घरात बसलो होतो.माझ्यासोबत माझे मिञ श्री मोहन होडावडेकर, श्री संतोष राणे,पञकार श्री रुपेश पाटील ही मंडळी होती तेव्हा राजापूरच्या वखारीचा अगदी सनावलीसह आणि इतिहास कालीन संदर्भ देवून भरभरून माहीती जठार देत होते ती थक्क करणारी होती.
माझ्या या संपूर्ण प्रवासात मला जठारांकडून काय मिळाले ? जे आजच्या राजकीय परिस्थितीत अपेक्षित असते.त्यापैकी मला काही मिळाले नाही.मला आणि माझ्या कुटुंबियानां प्रेम मिळाले.मानसिक आधार मिळाला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक संवेदनशील ” माणूस” मिळाला.या माणसांतील “माणसाला” पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन!
