You are currently viewing वेंगुर्ल्यात वैभव नाईक यांचे जंगी स्वागत; शिवसेना बालेकिल्ला पुन्हा उभारण्याचा निर्धार

वेंगुर्ल्यात वैभव नाईक यांचे जंगी स्वागत; शिवसेना बालेकिल्ला पुन्हा उभारण्याचा निर्धार

“गावागावात शिवसेना वाढविण्यासाठी विभागवार दौरे” – जिल्हाप्रमुख वैभव नाईक

वेंगुर्ले :

वैभव नाईक यांनी नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून वेंगुर्ले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली असता, तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत वातावरण दुमदुमून सोडले. कार्यक्रमात वैभव नाईक यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत वेंगुर्ले तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, वेंगुर्ले तालुका हा अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र अलीकडील निवडणुकांमध्ये दिशाभूल व पक्षफोडीमुळे सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला. तरीही जनतेने शिवसेनेवर विश्वास ठेवत काही जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक निवडून दिले आहेत. “हा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही विभागवार दौरे करणार असून गावागावात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, शिवसेना हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असून सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यालाही संधी दिली जाते, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक आमदार निवडणुकीपुरतेच मतदारसंघात येतात, त्यामुळे येथील प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख साक्षी चमणकर, महिला विधानसभा प्रमुख सुकन्या नरसुले, सौ. खानोलकर, शाखाप्रमुख गजानन गोलतकर, अभिमन्यू भुते, लक्ष्मी पेडणेकर, सौ. साटेलकर, दिलीप राणे, अण्णा फडतरे, सौ. वालावलकर, गोविंद परब, समीर शेटकर, दत्ताराम केळजी, अशोक नाईक, आबा चिपकर, वैभव फटजी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा