मंदिरातील वादातून हल्ला प्रकरण : पुराव्याअभावी आरोपी निर्दोष
ऍड. अशपाक शेख यांनी केला प्रभावी युक्तिवाद
कुडाळ
कसाल येथील मारुती मंदिर परिसरात मंदिर पावित्र्याचा प्रश्न उपस्थित केल्यावरून एका मजुराच्या डोक्यात दारूची बाटली मारून जखमी केल्याच्या प्रकरणातील आरोपी निलेश राजू यादव (25, रा. मध्यप्रदेश) याची ओरोस येथील मे. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी मन्नु संतोषी राजपुत (वय 32, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. ओवळीये सडेवाडी) हे मालवण येथील चिरेखाणीवर मजुरीचे काम करतात. दि. १४ मार्च २०२५ रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास मन्नु राजपुत हे त्यांचे मित्र कैलास, शेषलाल आणि सतीश राजपुत यांच्यासोबत कसाल बाजारपेठेतील मारुती मंदिर येथे बसले होते. त्यावेळी तिथे निलेश यादव हा दारूच्या नशेत बडबड करत होता. “हे मंदिर आहे, इथे बडबड करू नकोस,” असे मन्नु यांनी त्याला समजावून सांगितले. याचा राग येऊन निलेश यादव याने खिशातील काचेची बाटली काढून मन्नु यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात मारली. या हल्ल्यात मन्नु गंभीर जखमी झाले होते. त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ११८ (2) अन्वये गुन्हा (रजि. नं. १२/२०२५) दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून ओरोस येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने साक्षीदारांची तपासणी केली. मात्र, उलटतपासणी दरम्यान आरोपीविरुद्ध कोणताही ठोस आणि सबळ पुरावा सिद्ध होऊ शकला नाही. आरोपीचे वकील ऍड अशपाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, मा. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री. ए. ए. चेंडके यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने ऍड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना या प्रकरणात ऍड. पंकज खरवडे, ऍड. विनय रजपूत व ऍड. कैस शेख, ऍड. भूषण कदम, यांनी मोलाचे सहकार्य केले.
ऍड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
