You are currently viewing महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतनासाठीची कार्यपद्धती जाहीर

महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतनासाठीची कार्यपद्धती जाहीर

 *वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ…

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार

कुडाळ :

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर केली आहे. सदरचा शासन निर्णय दि. 19 जून 2025 रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्यावतीने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर शासन निर्णय अवर सचिव सगुणा काळे ठेंगील यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कल्याणकारी शासन निर्णयामुळे असंख्य कामगारांना सदर योजनेचा फायदा मिळणार आहे. माजी कामगार मंत्री मान. सुरेशजी खाडे व आताचे कामगार मंत्री मान. आकाशजी फुंडकर यांची मंत्रालयीन पातळीवर भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने गेली अनेक वर्ष कामगार यांच्या साठी पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतन सुरू करावे व कामगार यांच्या कल्याणासाठी अनेक प्रश्न मंत्रालयीन पातळीवर मागणी करण्यात आले होते. यावेळी कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांची भेट घेऊन निवृत्तीवेतन सुरू करण्यासंदर्भात लक्ष वेधले होते. कल्याणकारी शासन निर्णयामुळे कामगारांचा आनंद व्दीगुणीत झालेला आहे अशी प्रतिक्रिया श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केली.

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ च्या कलम (२२) (ब) मध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे. याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन २८ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयातील योजनेबाबत आवश्यकतेनुसार कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद केले होते. त्यानुषंगाने मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू केलेल्या निवृत्तीवेतन योजनेबाबत कार्यपद्धतीची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

*निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष*:

(१) वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान १० वर्षे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील.

‌ (२) पती/पत्नी च्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि, पती/पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.

(३) केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा, १९५२ अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत.

 

*निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण/दर* :

(अ) मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.

(ब) मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण/दर खालीलप्रमाणे राहील :-

👉 १० वर्षे – ५०%(रु. ६०००/-)

👉 १५ वर्षे – ७५%(रु.९०००/-)

👉 २० वर्षे – १००%(रु.१२,०००/-)

(क) मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेऊन, सदर योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल.

 

*निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती* :

(१) सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने http://mahabocw.in/ या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामुल्य प्राप्त करून घ्यावा. ( अर्जाचा नमुना “*प्रपत्र-अ*”प्रमाणे)

(२) सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधारकार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे (WFC) प्रभारी (कामगार उपायुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.

(३) निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत :-

अ. पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत

ब. जन्मतारखेचा पुरावा – जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित छायाप्रत

क. बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत

(४) संबधित प्रभारी, जिल्हा कामगार अधिकारी सुविधा केंद्र सदर अर्जांची छानणी करून “*निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र*” (प्रपत्र-ब) सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी/नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून “*वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र*” (प्रपत्र-क) संबंधित प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे.

(५) मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास “*निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र*” देण्यात येईल. (प्रपत्र-ड)

(६) निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल.

(७) दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला (प्रपत्र-इ) पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यासाठी त्याने आधारकार्ड/मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडून हयातीचा दाखला प्राप्त करून द्यावा. जेणेकरून, त्या वर्षीचे निवृत्तीवेतन त्याच्या खात्यात जमा करता येईल.

(८) मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलावयाचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.

(९) मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याचा/तिचा वारसदार पती/पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.

(१०) सदर निवृत्तीवेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा