You are currently viewing सावंतवाडीत दारू तस्करीविरोधात पोलिसांची धडक मोहीम; दोन कारवायांत १०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडीत दारू तस्करीविरोधात पोलिसांची धडक मोहीम; दोन कारवायांत १०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडीत दारू तस्करीविरोधात पोलिसांची धडक मोहीम; दोन कारवायांत १०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

तळवडे व आंबोली येथे दोन वाहनांमधून गोवा बनावटीची दारू जप्त; तीन आरोपींवर गुन्हे दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि आंबोली दूरक्षेत्राच्या पोलीस पथकांनी दारू तस्करीविरोधात धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या वाहनांमधून गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त केली. या दोन्ही कारवायांमध्ये वाहनांसह एकूण १० लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री तळवडे गडगेवाडी-तळी स्टॉप परिसरात सापळा रचून गोव्याकडून येणारी स्विफ्ट कार (क्रमांक GA 05 D 5576) अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २८ पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये विविध ब्रँडची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू आढळून आली. पोलिसांनी १ लाख ७१ हजार २४० रुपयांची दारू व ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ७१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मेल्व्हिन फर्नांडिस (वय २६, रा. देवसा, उत्तर गोवा) व मनवेल फिलिप्स फर्नांडिस (वय ६६, रा. ख्रिश्चनवाडी, सातार्डा) यांच्याविरुद्ध दारूबंदी व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले, हवालदार कांडर व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, दुसरी कारवाई आंबोली फॉरेस्ट नाका येथे करण्यात आली. म्हापसा-गोवा येथून पुण्याच्या दिशेने जाणारी टाटा सुमो (क्रमांक MH 42 K 0269) संशयावरून अडवून तपासणी करण्यात आली. वाहनातून १२ बॉक्समध्ये विविध ब्रँडची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ४८ हजार ९६० रुपयांची दारू व ३ लाख रुपये किमतीची टाटा सुमो असा एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चालक गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, रा. गणेशवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.
दोन्ही प्रकरणांमध्ये सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत असून, जिल्ह्यातील दारू तस्करीविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा