You are currently viewing उत्स्फूर्तता आणि जगण्यातला सहजभाव म्हणजे आशाताई! – सुधीर गाडगीळ

उत्स्फूर्तता आणि जगण्यातला सहजभाव म्हणजे आशाताई! – सुधीर गाडगीळ

*उत्स्फूर्तता आणि जगण्यातला सहजभाव म्हणजे आशाताई! – सुधीर गाडगीळ*

*’भावांजली आशाताईंना…’ मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध*

पिंपरी

‘उत्स्फूर्तता आणि जगण्यातला सहजभाव म्हणजे आशाताई भोसले होत्या. त्यांच्या जाण्याने मी कमालीचा अस्वस्थ झालो आहे!’ असे भावपूर्ण उद्गार सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी खुशबू बंगला, पु. ना. गाडगीळ समोर, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी काढले. विख्यात गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजलीनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, सांगवी आयोजित ‘भावांजली आशाताईंना…’ या शब्दसुरांच्या मैफलीत कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी सुधीर गाडगीळ, मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका डाॅ. वंदना घांगुर्डे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी यांच्याशी मुक्त संवाद साधला.

सुधीर गाडगीळ म्हणाले की, ‘आशाताई विविध गुणसंपन्न होत्या. रमणबागेतील एका प्रकट मुलाखतीदरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली; परंतु सलग दोन तास स्वत: चिंब भिजत त्यांनी समोरील श्रोतृवर्गाला आपल्या वैविध्यपूर्ण गीतांनी भिजवून टाकले होते. सुमारे चार दशकांच्या कालावधीत तब्बल अठ्ठावीस वेळा त्यांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली; पण प्रत्येक मुलाखत वेगळेपणामुळे चिरस्मरणीय ठरली. आशा भोसले यांच्या अप्रकाशित खळबळजनक आत्मचरित्राचा पहिला वाचक होण्याची संधी मला मिळाली; परंतु अद्यापही ते प्रकाशित का झाले नाही, याचे कारण गुलदस्त्यात आहे!’ डाॅ. वंदना घांगुर्डे यांनी, ‘आशाताई यांना वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून दैवी सुरांचा वारसा प्राप्त झाला होता. रियाज अन् उत्स्फूर्तता यांचा सुरेख समन्वय साधल्याने त्याला परातत्त्वाचा स्पर्श झाला!’ असे मत व्यक्त केले. भाऊसाहेब भोईर यांनी २००२ मध्ये आशा भोसले पुरस्काराच्या निमित्ताने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना पिंपरी – चिंचवडमध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आणून संपन्न झालेल्या ऐतिहासिक मैफलीची आठवण जागवीत ‘लतादीदी भारतीय संगीताचा श्वास तर आशाताई म्हणजे उच्छ्वास होत्या!’ अशी भावना व्यक्त केली. मधू जोशी यांनी सांगली येथील मंगेशकर भावंडांच्या बालपणीच्या आठवणींचे किस्से कथन केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुक्त संवादात गायिका अर्चना सुतार यांनी सादर केलेल्या ‘जय शारदे वागेश्वरी…’ , ‘का रे दुरावा?’ , ‘केव्हा तरी पहाटे…’ या आशा भोसले यांच्या मूळ आवाजातील गीतांचे प्रभावी सादरीकरण करीत श्रोत्यांकडून दाद मिळविली.

अभय पोकर्णा, राम गायकवाड यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. आर. बी. पाटील यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा