*मनोहर–मनसंतोष गड प्रदक्षिणा : सह्याद्रीतील शौर्य, साहस आणि शिवस्पर्श*
सह्याद्रीच्या विशाल कुशीत दिमाखात उभे असलेले मनोहर आणि मनसंतोष हे जोडगड केवळ दगड-मातीचे दुर्ग नसून मराठ्यांच्या शौर्यगाथेचे अजरामर प्रतीक आहेत. इतिहासाच्या पानांत असा उल्लेख आढळतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मनोहरगडावर तब्बल ३४ दिवस वास्तव्य केले होते. त्यामुळे या गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच अधोरेखित होते.
अशा पावन भूमीची प्रदक्षिणा म्हणजे केवळ गडाभोवतीचा प्रवास नव्हे, तर शिवरायांच्या पावलांचा मागोवा घेत इतिहासाशी संवाद साधण्याचा एक पवित्र अनुभव असतो. दाट जंगल, उंच कडे, नागमोडी वाटा आणि प्रत्येक वळणावर भेटणारे सह्याद्रीचे रौद्र-सुंदर रूप यांमधून मार्गक्रमण करताना मनात इतिहासाबद्दलचा अभिमान आणि निसर्गाबद्दलचे प्रेम अधिक दृढ होत जाते. म्हणूनच मनोहर–मनसंतोषची प्रदक्षिणा आमच्यासाठी केवळ दुर्गभ्रमंती नव्हती; ती पराक्रम, श्रद्धा आणि सह्याद्रीप्रेम यांचा अविस्मरणीय संगम होती.
काही दिवसांपूर्वी दुर्गअभ्यासक संदिपजी तापकीर यांचा फोन आला. त्यांनी सहज विचारले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाद्या किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे का?” प्रश्न साधा होता; पण माझ्या विचारांना चालना देणारा होता. मुद्दामहून कोणत्याही गडाची प्रदक्षिणा मी यापूर्वी घातलेली नव्हती. त्यानंतर झालेल्या चर्चेत इतर गडांपेक्षा मनोहर–मनसंतोष गडाची प्रदक्षिणा अधिक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देणारी ठरेल, असे स्पष्ट झाले.
या गडापासूनच दुर्ग मावळा परिवाराचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू झाले होते. मनसंतोष गडापर्यंत यापूर्वी तीन वेळा गेलेलो असल्याने अर्धा प्रदक्षिणा मार्ग परिचित होता; मात्र पुढील मार्ग अपरिचित आणि दाट जंगलातून जाणारा असण्याची शक्यता होती. या दोन्ही गडांची प्रदक्षिणा यापूर्वी कोणी पूर्ण केल्याची माहिती उपलब्ध नसल्याने योग्य नियोजन करूनच जाण्याचे ठरवले.
मनोहरगड म्हटला की, माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात रोहन राऊळ आणि प्रणय राऊळ ही शिवापूर गावातील आमच्या दुर्ग मावळा परिवारातील मंडळी. सुरुवातीला त्यांनीच आम्हाला मनोहरगडाची ओळख करून दिली होती. लगेच रोहनला फोन करून प्रदक्षिणेचा विषय सांगितला. त्याची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार असल्याने एप्रिलचा दुसरा रविवार निश्चित करण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून मनसंतोषगडावर रॅपलिंग आणि क्लाइंबिंग अॅक्टिव्हिटी घेण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र चार वर्षांपूर्वी गडाकडे जाताना आमच्या टीमवर दोन वेळा मधमाश्यांनी हल्ला केल्याने आणि नंतर व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नव्हते. या मोहिमेसाठी रोहन, मी आणि लक्ष्मण गोसावी सर यांचे वेळापत्रक जुळत नव्हते; पण यावेळी योग जुळून आला. गोसावी सरांनीही एप्रिलच्या दुसऱ्या रविवारी होकार दिला आणि मोहिमेची तारीख निश्चित झाली. अशा अवघड मोहिमांमध्ये गोसावी सरांचा अनुभव आणि आधार आमच्यासाठी नेहमीच मोलाचा असतो.
या मोहिमेसाठी आम्ही पाचपेक्षा जास्त सदस्य न नेण्याचे ठरवले होते. समिल सर सहभागी होतील, अशी अपेक्षा होती; पण पूर्वनियोजित कामामुळे त्यांना येणे शक्य झाले नाही. मात्र आदल्या दिवशी कृष्णा गावडे सर सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले.
मनोहर–मनसंतोष गडावरील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही पूर्वतयारी केली होती. गवारेडे, बिबट्या यांसारखे वन्यप्राणी आणि मुख्यतः गडाच्या कपाऱ्यांमध्ये असलेला मधमाश्यांचा अधिवास यांचा विचार करून नियोजन करण्यात आले. मनसंतोषगड चढाईचे नियोजन असल्याने रोप आणि इतर गिर्यारोहण साहित्यही सोबत घेतले.
रविवार, दिनांक १२ एप्रिल रोजी मी आणि गावडे सर सकाळी सहा वाजता कुडाळहून निघालो. सावंतवाडीत रोहन आम्हाला सामील झाला. कलंबिस्त मळा येथे गोसावी सर भेटणार होते; मात्र त्यांना थोडा वेळ लागणार असल्याने आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
शिवापूर मार्गे चढ अधिक असल्याने आम्ही शिरशिंगे–गोठवेवाडी मार्ग निवडला. गेल्या जूनमध्ये गोठवेवाडी मार्गे काही अंतरापर्यंत नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही गोसावी सरांची वाट पाहत परिसरातील काही छायाचित्रे घेतली. सर आल्यानंतर मोटारसायकल जाईल तिथपर्यंत आम्ही गेलो आणि तिथे वाहन लावून पदभ्रमंती सुरू केली.
शिवापूरकडील रस्त्याच्या तुलनेत हा नवीन मार्ग कमी चढणीचा असल्याने आम्ही जलद गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. वाटेत गोसावी सरांचे रेस्क्यू मोहिमांचे अनुभव ऐकत, परिसरातील वनस्पतींची माहिती घेत आम्ही “बाजार आंबा” येथे पोहोचलो. शिवापूर आणि गोठवेवाडीमार्गे येणाऱ्या वाटा येथे एकत्र येतात. याच ठिकाणी आम्ही काही व्हिडीओ आणि छायाचित्रे घेतली.
यावेळी गोसावी सरांनी मधमाश्या आणि वन्यप्राणी हल्ल्याच्या प्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सर्वांना सूचना दिल्या. वॉकी-टॉकीचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मनोहरगडाच्या पायऱ्या सुरू होतात. येथे दुर्गपूजा करून आम्ही प्रदक्षिणेला प्रारंभ केला. पुढे कपारींचा भाग असल्याने आणि मधमाश्यांची पोळी असण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही अत्यंत सावधपणे पुढे सरकत होतो. प्रत्यक्ष वन्यप्राणी दिसला नसला तरी काही ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत होत्या.
पुढे शिरशिंगेकडील गडाचा भव्य कडा सुरू होतो. येथून आंबोली घाट, महादेवगड, नारायणगड, कावळेसाद पॉइंट आणि म्हातारीचा कडा स्पष्ट दिसत होता. खाली शिरशिंगे, गोठवेवाडी आणि मळईवाडीतील घरेही नजरेस पडत होती. येथून गडाच्या पश्चिम दिशेला आमचा मोर्चा आम्ही वळविला.
प्रदक्षिणेच्या सुमारे चाळीस टक्के अंतरानंतर एका झाडाखाली आम्ही विश्रांती घेतली. सोबत आणलेला सुका खाऊ आणि कॉफी घेत पुन्हा मार्गस्थ झालो. काही वेळाने मनोहर–मनसंतोष गडांच्या मधल्या खिंडीत आम्ही पोहोचलो. येथे मनोहरगडाची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली होती.
त्यानंतर मनसंतोषगडाच्या पायऱ्या सुरू झाल्या. दोन मजली पायऱ्या चढल्यानंतर पुढे केबल लावलेली दिसली. त्यासाठी बोल्टिंग केलेले होते. आवश्यक साहित्य आमच्याकडे असल्याने सर्वप्रथम गोसावी सर, त्यानंतर रोहन, गावडे सर आणि शेवटी मी अशा क्रमाने गडावर चढलो.
मनसंतोषगडावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. माझी या गडावरील ही तिसरी चढाई होती. यावेळी मागील दोन्ही वेळांपेक्षा अधिक छायाचित्रण आणि व्हिडीओ करण्याची संधी मिळाली.
गड उतरतानाही आवश्यक सुरक्षासाहित्याच्या सहाय्याने आम्ही सुखरूप खाली उतरलो. प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखालीच या गडाची चढाई करणे अत्यंत आवश्यक आहे. मनसंतोषगडाची चढाई मोजक्याच दुर्गप्रेमींनी केलेली असल्याने ती संधी तीन वेळा मिळाल्याचा आनंद अधिकच होता. आमच्या टीममधील रोहनने तर या गडावर तब्बल पाच वेळा चढाई केलेली आहे.
यानंतर थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा प्रदक्षिणेला सुरुवात केली. उपवडे गावाच्या दिशेने काही तटबंदीवजा बांधकाम आणि माचीसदृश भाग दिसून आला. येथून उपवडे तसेच वसोली गावाकडे उतरणाऱ्या वाटाही आहेत. परिसर पाहून आम्ही परतलो आणि मनसंतोषगडाच्या उत्तर दिशेने पुढील मार्गक्रमण सुरू केले.
या भागात मोठ्या प्रमाणात कारवी असल्याने वाट काढत पुढे जावे लागत होते. उत्तरेकडील कडा संपल्यावर आम्ही पूर्वेकडे मार्गक्रमण सुरू केले. हा भाग दाट झाडीने व्यापलेला होता. काही वेळाने एक नेढे दिसले. वरून जावे की खालून, याचा विचार करत असताना गोसावी सरांनी वरची वाट तपासली; मात्र मार्ग नसल्याने आम्ही खालून पुढे गेलो.
थोड्याच वेळात मनोहरगडावरील झेंडा दिसू लागला. दाट झाडीतून मार्ग काढत शेवटी आम्ही खिंडीत पोहोचलो. झाडीमुळे आणि छायाचित्रणामुळे मनसंतोषगडाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.
थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही मनोहरगडाच्या उर्वरित प्रदक्षिणेला सुरुवात केली. खिंडीतून उत्तर दिशेला जाताना जिवंत कारवीतून वाट काढावी लागत होती. सर्वात पुढे गोसावी सर मार्ग मोकळा करत होते.
या भागात झाडे आणि ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. मध्यावर एक नैसर्गिक गुहा लागली. येथे काही काळ विश्रांती घेतली. सोबत आणलेले दोन-तीन लिटर पाणीही संपत आले होते.
या कपारीसमोरून शिवापूर, वसोली, आंजीवडे ही गावे तसेच रांगणागड आणि हनुमंत घाट स्पष्ट दिसत होते. सह्याद्रीचे हे मनमोहक दृश्य पाहताना सर्व थकवा क्षणात दूर झाला.
पुढे एका टेकडीवर वाट असेल का याबाबत आम्हाला शंका होती. दुर्बिणीतून एक छोटी वाट दिसत असल्याचा अंदाज आला होता. वाट न मिळाल्यास मागे फिरण्याची वेळ आली असती; पण जवळ गेल्यावर ती वाट सापडली आणि आमचा उत्साह द्विगुणित झाला.
कारवीचा भाग संपल्यानंतर आम्ही शिवापूर गावाच्या दिशेला मनोहरगडावर ज्या ठिकाणी झेंडा लावला जातो त्याच्या खाली पोहोचलो. वरून पाहताना येथे भुयारी मार्ग असावा असा आमचा पूर्वी अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात ती दोन खडकांमधील नैसर्गिक पोकळी असल्याचे लक्षात आले.
खाली माचीसारखा भाग आणि एका बाजूला तटबंदीवजा बांधकाम दिसत होते. अशा ठिकाणांवरून परिसरावर लक्ष ठेवणे पूर्वी सोपे जात असावे. गडावरून अशा जागांचा अंदाज येत नाही; प्रदक्षिणेमुळेच आम्हाला ही ठिकाणे पाहता आली.
येथून प्रदक्षिणेचा केवळ पंधरा टक्के भाग बाकी होता. मात्र पाण्याअभावी थकवा जाणवत होता. तरीही परिसराचे सौंदर्य पाहून सर्वांनी येथे भरपूर छायाचित्रे घेतली. यानंतर दक्षिणेकडे मार्गक्रमण करत एक अवघड पॅच उतरून आम्ही कारवीतून वाट काढत खाली उतरलो आणि अखेर प्रदक्षिणा पूर्ण केली.
या दोन्ही गडांची प्रदक्षिणा यापूर्वी कोणी पूर्ण केली की नाही हे ज्ञात नसले, तरी कोणत्याही अडथळ्याशिवाय ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
बाजार आंबा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठानने उभारलेल्या बाकावर काही काळ विश्रांती घेत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. प्रदक्षिणेचे अंतर अवघे तीन ते चार किलोमीटर असले, तरी निम्मा मार्ग कारवी आणि दाट झाडीतून जात असल्याने अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागतो.
ही प्रदक्षिणा आमच्यासाठी फक्त गडाभोवतीचा प्रवास नव्हती; ती आमच्या राजांना वाहिलेली एक अभिमानाची मानवंदना होती. असा अनुभव लाभणे हे खरोखरच भाग्य आहे, आणि ते भाग्य आम्हाला लाभले याचा मनस्वी आनंद आहे.
आम्ही हा अनुभव घेतला… तुम्हीही एकदा नक्की घ्या!
जय शिवराय! 🚩
आपला,
गणेश नाईक
📱 ९८६०२५२८२५
📱 ९४२२२६३८०२
