You are currently viewing पुस्तक आणि मी

पुस्तक आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम ललितलेख*

 

*पुस्तक आणि मी*

 

एक दिवस पुस्तकांचा म्हणून साजरा करण्यापेक्षा पुस्तकांना कायमचेच मित्र बनविले तर किती चांगले… नाही का…!

पुस्तकं मित्रांसारखीच नेहमी उत्तम सल्ला आणि अमूल्य ज्ञान देतात… एकटेपणात साथ देतात अन् मनातील मरगळ, नैराश्य दूर करतात एका क्षणात.. मग का न करावी त्यांच्याशी मैत्री…?

हाताचं बोट धरून आई वडिलांनी चालायला, बोलायला शिकवलं…गुरूंनी बालवयापासून शब्दांमृत शिंपडून ज्ञानार्जन केलं अन् जगाने अनुभव देत सिद्ध केलं तरीही डोक्यात सूर्याच्या तेजासारखा तेजस्वी, लख्ख प्रकाश टाकतात ती पुस्तकेच…!

*”वाचाल तर वाचाल”*

असा अमूल्य विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिला आहे. ज्ञान आणि वाचन यांचे नाते हे बीज आणि वृक्ष यासारखे असते. एकदा का अक्षररूपी बीजांची रुजवण घातली की, पुस्तकांसारखे वटवृक्ष डौलाने उभे राहतात…फुलतात, बहरतात, सर्वांगावर शब्दसुमनांची बरसात करतात अन् ज्ञानाची रसाळ गोमटी फळे चाखायला देतात. या शब्दफळांचा आस्वाद घेणे म्हणजेच ज्ञानामृत ग्रहण करणे होय..! अन् असे अगाध ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकं वाचनाशिवाय दुजा पर्याय नाही.. ज्ञान म्हणजे अथांग पसरलेला सागर अन् पुस्तके ही त्या ज्ञानरुपी सागरापर्यंत पोचवणारं पूल… “ज्ञान ही शक्ती आहे, तर पुस्तक हे त्या शक्तीचे स्त्रोत आहे.”….आणि वाचन केलं तरच ज्ञान मिळणार हेच समीकरण…! ज्ञान अमूर्त असते, पुस्तके त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून देतात. वाचन करणे म्हणजे केवळ पुस्तकांचं वाचन…! कारण, ती स्पर्शज्ञान, नेत्रज्ञान अन् गंधज्ञान सुद्धा देतात. पुस्तकांचा गंध म्हणजे केवळ कागदाचा वास, दर्प नसतो तर ती असते एक भावना. जगातल्या कुठल्याही अत्तर, फाया पेक्षाही त्याचा सुवास अन्यन्यसाधारण असतो, तो मन मोहून टाकतो, मेंदूतील स्मृती अन् भावनांना जोडतो, मनात दडलेल्या जुन्या आठवांना उजाळा देतो, डोक्यातील नकारात्मक विचारांचं काहूर दूर करून मनःशांती प्रदान करतो, एकाग्रता वाढवतो, स्पर्शाची जाणीव करून आपणास पुस्तकांकडे आकर्षित करतो, हा मनमोहक, अलौकिक सुवास खरेतर वाचनाचे वेड लावतो.

पुस्तकं वाचण्याने बुद्धी तल्लख होते, ज्ञान वाढते पण, एकदा का ती सवय लागली की, शब्द शब्द रेंगाळतात नजरेसमोर, तरळतात जिभेवर, बकुळ फुलांच्या गंधासारखे चिरकाल गंधाळत बसतात मनात, अन् दूर करतात माणसाचा एकटेपणा..जणू आपल्या जवळचे मित्र असल्यासारखेच घर करतात हृदयात कायमचे…पण, मोबाईलवर आलेले संदेश म्हणजे अळवावरचे पाणी.. काहीवेळ दिसतात अन् नकळत गायब होतात. ते वाचून ज्ञान वृद्धी होत नाही तर त्याकडे बहुतांश वेळी दुर्लक्षच होतो. पुस्तकांचे तसे नसते; शब्दांची, पुस्तकांची आवड असणारे पानांवरील शब्दांशब्द मन लावून वाचतात, त्यांतील विचार आत्मसात करतात अन् मिठाईने पोट भरपेट भरावे तसे शब्दांमृत पिऊन तृप्त होतात…!

अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आपली पोटची पोरं कधीतरी परतून घराकडे येतील अन् प्रेमाने कुशीत शिरतील अशी वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या आई बापासारखीच वाचनालयातील जुनी पुस्तके वाचकांच्या प्रतीक्षेत कपाटात एकांगी पडून धूळ खात आहेत…म्हातारीच्या फाटलेल्या लुगड्यासारखीच त्यांची पाने जीर्ण, छिन्नविछिन्न होऊन कपाटातील फळीवर आपला निस्तेज देह ठेऊन विसावली आहेत जणू अखेरच्या घटका मोजत. खरंतर विज्ञानाचा पगडा असलेल्या नव्या पिढीला आज *”लिहा, वाचा, शिका, साक्षर व्हा…”* सांगावं लागतं आहे हे दुर्दैवच…! एकीकडे पुस्तकांशी असलेली मैत्री तोडून माणसांनी संगत मोबाईलची केली…जणू घनिष्ठ मैत्रीच..! हक्काचे नाते जोडले; अन् वाचन संस्कृतीशी पर्यायाने पुस्तकांशी फारकत घेतली. त्यामुळे खरे ज्ञान प्राप्त न होता सोशल मीडियावर मिळणाऱ्या, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर लोक स्वतःला ज्ञानपंडित समजू लागले. “गूगल वर काहीही शोधलं तरी भेटतं” या भाबड्या गैरसमजामुळे लोकांनी अंधपणे “गूगल म्हणजेच सर्वज्ञानी” अशी संकल्पना मनात रूजविली. शाळा, महाविद्यालयातील मुले देखील वाचनापासून दूर गेली. प्रश्नांची उत्तरे तर एका वाक्यात किंवा पर्याय शोधून लिहू लागली. पुस्तकातील धडे वाचणे हे शाळांनी देखील बंदच केले आणि त्यामुळे मुलांची वाचनाची आवड कमी झाली. पर्यायाने अतिरिक्त वाचन थांबलं आणि सुसंस्कृत, सुशिक्षित पिढीची निर्मिती होण्यापेक्षा अशिक्षित, अर्धशिक्षित लोक समाजात उच्च पदवीधर असल्याप्रमाणे वावरू लागले. शैक्षणिक युनिव्हर्सिटीच्या पुढे जाऊन व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी काम करू लागली…जे व्हॉट्सॲप वर येईल तेच सत्य मानून लोक अर्धशिक्षित बनले.

“प्रत्येकाला एक छंद असावा” असं म्हटलं जातं. कारण चांगला छंद प्रकृती आणि आरोग्यासाठी लाभदायक असतो. पुस्तक वाचनासारखा छंद जीवनात सद्विचार रुजवतो आणि सद्गुण अंगी भिनवतो, जसे चंदनाच्या सहवासाने चंदनाचा दर्प सर्वांगाला येतो अगदी तसाच…! एकदा का नजरेला शब्दांशी खेळण्याची सवय लागली की, इतर गोष्टींचा विसर पडतो अन् लळा शब्दांचा लागतो, मनोमन ओढ शब्दांची वाढते जशी घरात नव्यानेच जन्माला आलेल्या तान्हुल्याची ओढ लागते तशीच…!

मलाही पुस्तकांची ओढ तशीच लागली जेव्हा मी सर्वप्रथम *”मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचली अन् मला ती मनोमन भावली. कोणत्याही मराठी कादंबरीला लाभली नसेल एवढी अमाप लोकप्रियता मृत्युंजयला लाभली. महारथी कर्णाच्या दानशुरत्वाला तोडच नाही हे मृत्युंजय मधून आपल्या अनुभवास येईल. एकदा वाचायला सुरू केली की, पुढे पुढे वाचत जाण्याची उत्सुकता शिगेला पोचविणारी, अशी मृत्युंजय..! मृत्युंजय मधून कर्णाची अमर गाथा मांडलेली असून महाभारतातील पात्र महापराक्रमी, महारथी, दानशूर कर्णाला ही समर्पित आहे. “मरणानंतरही जिवंत असणे म्हणजे मृत्युंजय…!”. महाभारतात खलनायक म्हणून परिचित असलेला कर्ण हा महाभारतातील खरा नायक कसा होता ते या कादंबरीतून आपल्या समजून येईल. दानशूरपणा, संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जपावी, शक्तीची घमेंड उतरविणारी अशी ही ऐतिहासिक अजरामर कादंबरी…

लेखिका शोभा राऊत लिखित *”अबोल प्रीत बहरली”* प्रितीचे पुष्प मनामनात फुलवणारी, जिथे आदर, विश्वास आणि सुरक्षितता असते, तिथेच प्रेमाचा खरा आविष्कार घडतो हे दाखवून देणारी ही कादंबरी. महाविद्यालयीन जीवन म्हणजे युवक युवतीच्या भावविश्वाची एकेक पाकळी फुलत उमलणारे गुलाबपुष्प…! रोजचे जीवन, सहलीतील गमतीजमती, मजेशीर किस्से, आणि परीक्षा असे महाविद्यालयीन जीवन लेखिकेने या कादंबरीतून शब्द कळ्यांना गुंफून पुष्पहारासम उभे केले आहे… युवापिढीच्या हृदयाच्याजवळ जाणारी, आकर्षून घेणारी अशी ही कादंबरी आहे. कुमुदिनी रांगणेकर, वि. स.खांडेकर यांच्याही अनेक अफलातून कादंबरी वाचण्यासारखा आहेत. कविवर्य केशवसुतांच्या कविता “संध्याकाळ”, “तुतारी”, “स्फूर्ती” तर मनावर राज्य करतात… पु. ल., अत्रे अशा अनेक दिग्गजांनी पुस्तके वाचणे म्हणजे आपले भाग्यच…! आपल्याही नशिबी ते भाग्य लाभावे ही प्रत्येकाची इच्छा असावी.

पुस्तकांचा नाद

लागो मज वेडा

अक्षर ओढीची

मना भुरळ पाडा

पुस्तकांचा नाद लागेल तेव्हा नक्कीच अक्षरांची ओढ वाटेल अन् शब्दांची मनावर भुरळ पडून प्रत्येक वेळी पुस्तक हातात दिसेल.

तुम्ही कधी पाहिलंय का.., एका चित्रात मांजर पुस्तकांची पाने चाळताना ती फडफडणारी पाने थांबवताना दिसते… तेव्हा मात्र मन पुन्हा एकदा तिथेच रेंगाळतं… जिथे मुलांनी, माणसांनी वाचक म्हणून पुस्तकाकडे दुर्लक्ष केला तिथे अक्षर ओळख नसलेलं मांजर नक्की काय वाचतेय…? तिला त्यात काय समजतं..? असे प्रश्न मनाशी घर करतात. परंतु….

मला वाटतं…मांजर वाचत नसेल, चित्रही पाहत नसेल तर वाचकांनी आपल्याकडे पहावे म्हणून वाऱ्याने फडफड करणारी पाने शांत करून मानव जातीला फडफड करणाऱ्या पुस्तकाकडे पहा…अन् पुन्हा एकदा वाचनाकडे वळा… कारण “वाचाल तरच वाचाल” असा डॉ. बाबासाहेबांचा सल्ला मानायला सांगत असावे असेच वाटते…!

 

*©दीपक पटेकर [दीपी]*

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा