एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन; AI मुळे इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी येथील इंजिनिअर्सनी उद्योजक बनून पुढे यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खासदार तथा एसएसपीएमचे संस्थापक नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसएसपीएम) इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक उत्पन्नात राज्यात अग्रस्थानी यावा, तसेच येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी नव्या पिढीने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उद्योग क्षेत्रात उतरावे.
मी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंजिनिअर्सची कमतरता असल्याचे लक्षात आले होते. त्या वेळीच या कॉलेजची संकल्पना मांडली, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या यशामागे सिंधुदुर्गच्या जनतेचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार नितेश राणे, संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी बोलताना सांगितले की, दर्जेदार शिक्षण आणि पालकांच्या कष्टांमुळेच संस्थेची प्रगती होत आहे. उत्तम प्राध्यापकवर्ग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संस्था उंचावत आहे.
डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या सुमारे ७२ टक्के क्षेत्रावर इंजिनिअरिंगचा प्रभाव आहे. AI तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांत मोठी प्रगती होत असून आरोग्य क्षेत्रातही त्याचा मोठा फायदा होत आहे.
