You are currently viewing मालवण बाजारपेठेतील दहा महिने रखडलेल्या  कामाला  मिळणार चालना

मालवण बाजारपेठेतील दहा महिने रखडलेल्या  कामाला  मिळणार चालना

भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या मागणीची प्रदेश सचिव निलेश राणेंनीही घेतली गंभीर दखल ; दोन दिवसात स्वतः करणार पाहणी

मालवण

मालवण बाजारपेठ दलित वस्ती चर्मकार वसाहत रस्ता गटाराचे बांधकाम करणे या सुमारे २८ लाख निधीतून होणाऱ्या कामाचे कार्यरंभ आदेश फेब्रुवारी २०२२ मध्ये देण्यात आले. मात्र, दहा महिने उलटले तरी अद्यापही काम सुरु झाले नाही. या प्रश्नी नागरिकांच्या तक्रारी वरून मालवण भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी वस्तुस्थिती जाणून घेत संबंधित काम येत्या आठ दिवसात सुरु न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, याबाबत भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसात श्री. राणे मालवणात येऊन स्वतः या कामाची माहिती घेणार आहेत. त्यामुळे सदरील कामाला चालना मिळणार आहे.

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे काम जिल्ह्यातील एका ठेकदाराने घेतले असले तरी या कामाची पोट ठेकेदारी मालवण शहरातील एकाकडे असल्याची माहिती देण्यात आली आहे. जनहिताच्या दृष्टीने मंजूर झालेल्या कामांबाबत अशा प्रकारे दिरंगाई होत असेल तर याबाबत निश्चितच आवाज उठवला जाईल, असे ताम्हणकर यांनी स्पष्ट कले आहे. सदरील काम लवकरात लवकर सुरु करावे याबाबत पालिकेच्या माध्यमातून संबंधित ठेकेदारास सूचना देण्यात आल्या. मात्र, ठेकेदाराकडून काम सुरु झाले नाही. काही दिवसापूर्वी ठेकेदाराने मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून २६ ऑक्टोबर नंतर तात्काळ काम सुरु करण्यात येईल असे सांगत कामाला मुदतवाढ़ देण्याची मागणी केली होती. मात्र त्यालाही एका एक महिना उलटला तरी काम सुरु झाले नसल्याने ताम्हणकर यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून व उपलब्ध कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे.

भाजपची भूमिका ही नेहमीच जनाहिताला प्राधान्य देणारी राहिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम सुरु न झाल्यास माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील भूमिका घेतली जाईल असे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कामाची माजी खासदार निलेश राणे यांनी दखल घेतली असून येत्या दोन दिवसात ते स्वतः याची पाहणी करणार आहेत. त्यामुळे सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्यातून दहा महिने रेंगाळलेल्या कामाला चालना मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =