You are currently viewing सावंतवाडी-आंबोलीत अवकाळी पावसाचा तडाखा; बागायतदारांचे मोठे नुकसान

सावंतवाडी-आंबोलीत अवकाळी पावसाचा तडाखा; बागायतदारांचे मोठे नुकसान

सावंतवाडी-आंबोलीत अवकाळी पावसाचा तडाखा; बागायतदारांचे मोठे नुकसान

विजांच्या कडकडाटासह तासभर पाऊस; आंबा, काजू, फणस पिकांवर परिणाम

सावंतवाडी :

राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीसह काही भागांना गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक बदललेल्या हवामानामुळे विजांच्या कडकडाटासह तब्बल एक तास पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
एप्रिल महिन्यातील उकाड्याचा त्रास सहन करत असताना सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि विजांचा लखलखाट सुरू झाला. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर तालुक्याच्या इतर भागांतही हलक्या सरी कोसळल्या. या अनपेक्षित पावसामुळे ग्रामस्थांची धांदल उडाली.
कोकणातील आंबा, काजू आणि फणस हंगाम आधीच अडचणीत असताना या पावसाने बागायतदारांवर संकट ओढवले आहे. तयार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यातील या अवकाळी पावसामुळे शेतीकामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या कोकणातील बळीराजा शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा