You are currently viewing मध्यन्तर

मध्यन्तर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*मध्यन्तर*

 

“दोन कॉफी दे”,मी म्हणालो

“कपॅचीनो की लॅटे ?”, त्याने विचारले

“अरे!,ब्लॅक कॉफी, बोइलड कॉफी अगदी गेला बाजार नेस्काफे वगैरे नाही का?”

तो चक्क “नाही” म्हणाला

“मी काही इंग्रजी किंवा हिंदी सिनेमाला नाही आलो,मराठी सिनेमाला आलो आहे रे!”, मी चिकाटीने बाजू लावून धरली

तरीही तो नाहीच म्हणत राहिला

 

मल्टिप्लेक्स थिएटरच्या इंटरव्हलमध्ये झालेला हा संवाद.

मराठी माणसाची गळचेपी का काय म्हणतात ती बहुदा हीच असावी.

 

कसली ती kapachino की काय ती कॉफी?

गरम कॉफीत फ्रिज मधल्या थंडगार लोण्याची तरंगणारी नक्षी काढायची आणि वर फारच छान असेही म्हणायचं !

 

मध्यन्तरात “मधुकर” च्या काउंटर वर गवती चहाचा स्वाद असलेला चहा मिळायचा यंव रे यंव!

“आराधना” पाहतांना मध्यंतरात तिथला चहा प्याला की आपल्यालाही वाटायला लागायचं की आपणही एअर फोर्स मध्ये आसामला पोस्टिंग वर आलोय जणू.

 

सिनेमा सुरू झाला की शिट्ट्या मारुन थेटर दणाणून जायचं,तो जमाना काही और होता.

(अद्याप गाणं सुरु झालं की जागा सोडून बाहेर जाणाऱ्या शिष्टांचा जमाना आला नव्हता.)

अगदी राजकुमारचा पांढरा बुट पडद्यावर दिसला की थेटर(हो! थेटरच थिएटर नव्हे) गर्जून जायचं.

आणि शम्मी कपूरने “ओ हसीना” किंवा “याsssहू” म्हणायचा अवकाश चित्रमंदिर च्या मधल्या मोकळ्या जागेतून

सळळळळळळकन एक तरी बशी (हो! त्याच त्या चहाच्या काऊंटरवरुन ढापलेली) पडद्याच्या/स्टेजच्या दिशेने सरारत जायची आणि खळळकन फुटायची.

ती मजा खाली कार्पेट असल्याने कसली यायला गेली ह्या मल्टिप्लेक्सात ?

 

चारही दिशेनं येणारे प्रकाशाचे कवडसे कधी खटकले नाहीत,”विकास” मध्ये “मॅकानाज गोल्ड” किंवा “बेनहर” बघतांना.पडद्यावर जेम्स बाँड पाहतांना ती मदनिका आपल्याच गळ्यांत हात घालत आहे चा भास व्हायचा

आणि चित्रपट सुटल्यावर मनांत घोळत रहायचं,

“आय ऍम बाँड, जेम्स बाँड!”.

“द गुड द बॅड द अगली” पडद्यावर आणि बाजूला सुद्धा.

दुसरे महायुद्ध तर शाळेपेक्षा जास्त “विकास” मध्येच शिकवले गेले.

 

“हेमलताच्या” भिंती चिकन्या होत्या आणि त्या मुळे आवाज घुमायचा तरीही मध्यंतरात नेहेमीच वाजणारं “कांच की चुडीया”,”कांच की चुडीया” कधी कर्णकर्कश वाटलं नाही.

आणि “प्रभातच्या” कोणत्याही खुर्चीवर बसा आणि पडद्यावर चं दृश्य पुढल्या सीटवरच्याचे डोके टाळून बघून दाखवा! रोख शंभर रुपये बक्षीस!

आलं पाहता? आलं नाहीना?

नाही ना बघता आलं?

नाही बघता आलं तर नाही आले तरी “मेरा गांव मेरा देश” ची मजा तसूभरही कमी नव्हती झाली.

 

“दामोदर” नावाचं स्टायलिश थिएटर नवीनच होतं.

उदघाटनालाच देवानंद आला होता त्याच देवानंदी स्टायलित.काय गर्दी उसळली होती म्हणून सांगू?आख्ख नासिक भारावून गेलं होतं.

 

आजकाल तर नवनवीन मल्टिप्लेक्स होताहेत ती सुरू झाली की नाही काय ते कळतही नाही!

 

“दारासिंग” चे फायटिंगचे चित्रपट पाहतांना, उगाचंच्या उगाच दंडावरची बेडकुळी तपासली जायची.

तेंव्हा त्याची नायिका मुमताज असायची, नाही पटत ना ?

ठराविक पात्रं असायची दारासिगच्या चित्रपटात जसे की, मोहन चोटी, मुख्तार,के.एन.सिंग, रंधवा

त्या तिकीट बारी च्या गर्दीत शिरुन आपल्याला पाहिजे ती तिकीटं मिळवली की काय अभिमान वाटायचा राव?

(एखादं जास्तीचं तिकीट काढून ब्लॅक ही करायचो🤫)

ती मजा काही औरच होती.

पण,ती गर्दीतली मजा त्या नतद्रष्ट “बुक माय शो” ने घालवली.घरबसल्या तिकिटं मिळाली यात कसला आलाय रोमांच?

 

मध्यन्तरात मुतारीच्या अरुंद बोळात सिगरेट ची धुम्रवलयं काढली जायची शत्रुघन सिन्हा सारखी .

धुम्रवलंय आणि ते काढायचं प्रशिक्षण तिथंच तर मिळायचं, आता सारखा स्मोकिंग झोन वेगळा नव्हता.(नतद्रष्ट लेकाचे!)

 

धार मारता मारता कसलं तोडलंय ऍकटिंग!

किंवा, काय झकास दिसते यार ती !

किंवा काय झकास झुल्फ उडवलीयेत यार !

एकदम कडक हं !

म्हणत गप्पा रंगायच्या.

कित्येकदा तर इथेच त्या विशिष्ट हिरोचे फॅन क्लब जमा व्हायचे आणि इतिहास खंगाळून काढायचे.

 

एकदा तर एक मित्र तिथेच भेटला, ज्याने खूप महत्त्वाचे काम आहे म्हणून आमच्या कँपनीतून गेटपास घेतला होता आणि आला होता इथे सिनेमा पाहायला!

असले अवलीये पाहिले आणि हिंदी सिनेमा संस्थेचं बलस्थान जाणवलं.

एक अतूट वीण आहे भारतीय चित्रपट आणि भारतीयांची.

अगदी तिकिटाला पैसे नसो वा असो !

तासनतास येणाऱ्या चित्रपटांची पोस्टर्स पाहिलेली आजही आठवतात.

हो!ती जाळीदार कपाटातली फोटोंची जत्रा!

 

च्यामारी ह्या मल्टिप्लेक्सच्या, सगळ्या सगळ्यावर पाणी फिरवले!

आता तर समजतही नाही कोणता सिनेमा आला आणि कोणता गेला ते.

आणि आम्ही बिचारे गेलोच तेथे तर मध्यंतरांत पीत बसतो ती गारढोन कपाचीनो कॉफी !

 

—राजा जोशी

9823687519

२३ एप्रिल २०२६

 

☕ ☕ ☕ ☕ ☕ ☕ ☕ ☕

प्रतिक्रिया व्यक्त करा