*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चैत्र गौर*
चैत्र मासी, हर्ष मानसी
होता, चैत्र गौरीचे आगमन
परंपरा मराठी माणसाची
करू या आपण जतन.
चैत्र गौरीची स्थापना
होते चैत्र शुद्ध तृतीयेला
महिनाभरासाठी पार्वती गौरी
येत असते हो माहेराला
ऋतु फुललेला,नवसृजनाने
चैतन्याने भारलेला आसमंत
चैत्र गौरीच्या स्वागतासाठी
रंग उधळीत आला वसंत
माहेरवाशीणीचा थाटमाट
छान झोपाळ्यावर झुलते
गर्भरेशमी खणवस्त्र ते
मुलायम, अंगावर पांघरते.
सुगंधी मोग-याचा गजरा
दरवळ त्याचा देव्हाऱ्यात
हळदी कुंकू वहाताच
प्रसन्नता मनगाभा-यात
आंबेडाळ आंबटगोड हळदुली
कैरी. पन्हे. गार गार
नैवेद्य गौरीचा असे हो
चविष्ट .स्वादिष्ट, सुंदर फार
हळदी कुंकू गौरीचे स्त्रियांसवे
उत्साहात साजरे होते खास
साडी लोहपेटीच्या पाय-यांवर
खेळणी,वस्तुंची सुरेख आरास
लाल टरबूज ,पिवळे खरबूज
चकली करंज्यांनी भरली ताटे
आंब्याची पाने, मोगरा फुले
भिजले चणे , आनंद दाटे.
सुख समृद्धी प्रसन्नता चैतन्य
घेऊन येते माहेरासी चैत्रगौर
माहेरांगणी आनंद लुटते नित्य
मन होते भावुक भावविभोर.
प्रसन्न,आशिर्वाद देऊनी
परतते , एकमासाने सासराला
डोळे भरूनी ,पाणावले तरी
रूढी,प्रथेने, द्यावा निरोप गौरीला.
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर
मो नं 7020757854
