कुंभारमाठ येथे आदिवासी कातकरी नागरिकांसाठी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
मोफत तपासण्या, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम
मालवण
कुंभारमाठ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र चौके यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी कातकरी नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांची रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे, ECG तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. पुनम वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. मानसी भोगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, सदस्य प्रमोद भोगावकर, आरोग्य सेविका सौ. डॉरी, आरोग्य सेवक श्री. लक्ष्मण नातेवाड, आशा सेविका सौ. प्रणिता भोगावकर, सौ. अश्विनी नेवाळे, सी.आर.पी सौ. सारीका फोंडेकर, महिला बचत गट प्रतिनिधी सौ.दिपिका आंगणे, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉक्टर व प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरासाठी श्री. महेश फोंडेकर व सौ. सविता फोंडेकर यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची मोठी संधी मिळाली असून ग्रामस्थांनी या शिबिराचे स्वागत केले.
