You are currently viewing महाराष्ट्रातील आघाडीची बीट बॉक्सर साधना तावडे यांची बीट बॉक्सिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्रातील आघाडीची बीट बॉक्सर साधना तावडे यांची बीट बॉक्सिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात बुधवारी, १५ एप्रिल २०२६ रोजी बीट बॉक्सिंग कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

‘सैय्यारा हिंदी चित्रपट आणि मित्रां जाहिरातीत झळकलेल्या ख्यातनाम बीट बॉक्सर साधना तावडे यांचे थेट मार्गदर्शन या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुमेधा नाईक, साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, तसेच सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी स्वागत केले.

प्रास्ताविकात श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी साधना तावडे यांचा परिचय करून दिला. स्वयंशिक्षित बीट बॉक्सर म्हणून त्यांनी हिप-हॉप फन जॅम, Spotify 91अशा मेगा शोमध्ये सादरीकरण केले असून, त्या नोरा फतेहीसोबतच्या जाहिरातीत झळकल्या आहेत. तसेच मोहित सूरी दिग्दर्शित २०२५ मधील ‘सैयारा’ या हिंदी चित्रपटातही त्यांचा सहभाग आहे.

यानंतर साधना तावडे यांनी त्यांचा बीट बॉक्सिंगचा प्रवास, त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. मालवणमध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत अगदी वय वर्षे ८ ते वय वर्षे ७० मधील लोकांचा सहभाग होता.

बीट बॉक्सिंग मधील करिअरविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपल्या कामाबद्दलची आवड आणि सातत्य यामुळे संधी निर्माण होतात. स्वतःवर विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वाचे असून YouTube व Instagram सारख्या माध्यमांचा योग्य वापर केल्यास उत्तम करिअर घडवता येते. झाडाला लगेच दुसऱ्या दिवशी फळे मिळणार नाहीत, पण आपण खतपाणी घालत राहिले की एक दिवस फळे लागायला सुरुवात होतेच, तसेच बीट बॉक्सिंग करत राहायचे, नवीन पॅटर्न्स शिकत राहायचे आणि सादर करत राहायचे, तुम्हाला संधी चालून येतील, असे प्रतिपादन केले.

डॉ. सुमेधा नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, २०१७ पासून साधना तावडे यांनी या क्षेत्रात वाटचाल सुरू केली असून कठीण प्रवासानंतर त्या आज यशस्वी महिला बीट बॉक्सर म्हणून ओळखल्या जातात. बीट बॉक्सिंग ही एक सांस्कृतिक अभिव्यक्ती असून अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यशाळेला विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी यांची मोठी उपस्थिती लाभली. प्रश्नोत्तरांच्या सत्रामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक झाला. उपस्थितांचे समूह करून प्रत्येक गटाला बीट बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक केल्यामुळे कार्यशाळेत रंगत आली. साधना तावडे यांचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी देखील सर्वांना मिळाली. तसेच बीट बॉक्सिंगसंदर्भातील कोर्सेस उपलब्ध करून देण्याची मागणी उपस्थितांनी केली.

या कार्यशाळेत सुहास ओरोस्कर, उमेश सांगोडकर, वैशाली पंडित, वैशाली शंकरदास, सारिका शिंदे, गौरव सांडव, दादा वेंगुर्लेकर, रिया दळवी, सुभाष कुमठेकर, सुधीर कुर्ले, वैष्णवी आचरेकर, ऋतुजा केळकर, सानिका वायंगणकर, स्वप्नील मिटकर, भारती आचरेकर, मनिषा पारकर, डॉ. राहुल पंतवालावलकर यांच्यासह टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गीत – संगीत प्रेमींनी सहभाग घेतला. एकूण ४० उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ज्योती तोरसकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा