You are currently viewing पक्षी वैभव वसंतातले

पक्षी वैभव वसंतातले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पक्षी वैभव वसंतातले* 

            

 

वसंतासवे बहरत जाती

पळस, बहावा अन पांगारा

अमृत त्याचे चाखायला

खगगण गोळा होतो सारा

 

भल्या पहाटे अंगणामध्ये

साद घालतो कोकिळ पक्षी

बुलबुल जोडी पहा रेखते

घरट्यामधली सुंदर नक्षी

 

पिवळ्या धम्मक हळद्याचेही

घरटे जमते खूपच भारी

मनाजोगते सारे जमता

“पी ओ लो ” ची शिट्टी मारी

 

किती मनोहर नकला करतो

दयाळ पक्षी सभोवताली

शिळ घालुनी अर्ध्या रात्री

सांगू पाहे पहाट झाली

 

“टुक टुक टुक टुक ” ऐकू येतो

तांबट पक्षी टकटक करतो

पाणवठ्यावर निळा, तपकिरी

खंड्या पक्षी दर्शन देतो

 

नभोमंडपी दिसें पावशा

शेतकऱ्यांना जागे करतो

“पेर्ते व्हा “च्या संदेशाने

कृषिवलाला तयार करतो

 

वसंतातले पक्षी वैभव

कुणाकुणाला नसेच ठावे

भरून डोळे सभोवताली

रसिकमनाने आस्वादावे

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

9130861304

16.04.2026

प्रतिक्रिया व्यक्त करा