मुंबई :
भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर आवाज हरपला आहे. दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.
आशा भोसले यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांना दिली. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत त्यांचं अंत्यदर्शन ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्ययात्रा काढली जाईल. सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चेस्ट इन्फेक्शन आणि अशक्तपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावरून प्रकृतीबाबत माहिती दिली होती.
सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत आशाताईंनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासह अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. ‘दम मारो दम’, ‘ओम शांति ओम’, ‘पिया तू अब तो आजा’ यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
क्लासिकलपासून कॅबरे, गझल, पॉप आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत प्रत्येक शैलीत आपली छाप उमटवणाऱ्या आशा भोसले यांना पद्मविभूषणसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
त्यांच्या सुरेल आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वात कायम स्मरणात राहतील.
