“तरूण-तरुणी आत्महत्या सहजपणे का करत आहेत “??
..अँड.नकुल पार्सॅकर,समुपदेशक…
सावंतवाडी
गेल्या पाच सहा वर्षांपासून आमच्या सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्या करणार्यां तरूण- तरुणींची वाढती संख्या हा जिल्ह्याच्या द्रुष्टीने अतिशय चिंताजनक असा सामाजिक विषय आहे.दुर्दैवाने या विषयाकडे गांभीर्याने पहाणारी आणि त्यावर विचार करणारी कोणतेच व्यवस्था कार्यरत नाही.आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करत आहेत पण त्याला मर्यादा आहेत.
साधारण बारा वर्षांहून जास्त काळ मी भारत सरकारच्या महिला बालकल्याण विभागाचा चाईल्ड लाईन हा उपक्रम होता जो दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झाला त्याचा मी संचालक होतो.तेव्हा टीन एज मधल्या मुलांच्या अनेक गंभीर समस्या घेऊन पालक माझ्याकडे यायचे.तेव्हा तासनतास पालक आणि मुलांचे समुपदेन करून समस्या दुर करण्यात काही प्रकरणात यश मिळायचे.मानसिक आरोग्य,मोबाईलचा गैरवापर, जीवनशैली,व्यक्तीमत्व विकास, करीअर ,मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर अटल प्रतिष्ठान या क्षेञातील अनुभवी वक्त्यांना पाचारण करून अनेक शाळां,महाविद्यालयातून जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहे.दुर्दैवाने राजकीय व्यवस्थेकडून अशा उपक्रमाना सहकार्य मिळत नाही.निवडणूकीच्या काळात पैशांचा वापर करून मोठ्या प्रमाणात तरूणांच्या झुंडी पोसल्या जातात माञ या बिघडत चाललेल्या सामाजिक आणि मानसिक व्यवस्थेवर कुणीच विचार करत नाही.
अटल प्रतिष्ठान संचलित महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अनुदानित सावंतवाडी पोलीस स्टेशन आवारात जे समुपदेशन केंद्र आहे त्या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे बाराशेहून जास्त कौटुंबिक प्रकरणे आलीत.मोठ्या प्रमाणात यापैकी समुपदेशन करून सोडविण्यात आमच्या समुपदेशकाना आणि संस्थेला यश मिळाले.
गेल्या महिनाभरापासून सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील चार ते पाच तरूण- तरूणीनी आपले आयुष्य अगदी सहजपणे संपवले.महाराष्ट्रातील वा देशातील इतर भागात कर्जाला कंटाळून हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहे पण आमच्या कोकणातील शेतकरी माञ असा मार्ग स्विकारत नाही.अगदी या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेले आंबा- काजू बागायतदार मोठ्या हिम्मतीने आलेल्या प्रसंगाला तोंड देत आहे.मात्र तरूण पिढी मानसिक दडपणातून आत्महत्येचा अविवेकी आणि अविचारी मार्ग का स्विकारत आहे? याचा विचार होणे आवश्यक आहे.
सावंतवाडीत एकामागून एक झालेल्या आत्महत्या या आजच्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आहेत.हे असे दिवसेंदिवस का बिघडत चाललेय?करीअरच्या एवढ्या संधी असताना,तंत्रज्ञान एवढे प्रगत झालेले असताना,मानसिक आरोग्यावर उपाय असताना असा शेवटचा आपले मौल्यवान जीवन संपवण्याचा निर्णय ही तरूण मंडळी का बरं घेत आहे? अपयशाने खचून न जाता सकारात्मक विचार का बरे करत नाही? भले एखादा दरवाजा बंद झाला असेल,आजची परिस्थिती पूर्वीसारखी नाही,स्काय इज द लिमिट.असे असताना आजच्या तरूण पिढीचे डिप्रेशनखाली जाण्याचे प्रमाण का बरं वाढले?
वैयक्तिक अडचणी आणि समस्येबरोबरचं बदलेली जीवनशैली आणि दिवसेंदिवस उध्वस्त होणारी सामाजिक चौकट,मानसिक ताणतणाव आणि जीवघेणी स्पर्धा,पालकांची टोकाची भूमिका आणि महत्त्वाकांक्षा ,करीअरचा दबाव अशा कारणाबरोबर इतरही कारणे आहेत.पालक आपल्या पाल्यांची क्षमता न ओळखताचं अपेक्षांचे ओझे त्यांच्या टोक्यावर ठेवतात.इतर हुशार मुलांबरोबर तुलना करतात.चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून उत्तम गुण मिळाले पाहिजे यासाठी मुलानां वेठीस धरल्याने मुलांवर मानसिक दडपण आणि दबाव येतो.यामुळे सुद्दा आत्महत्या होत आहेत.
माझ्या कुटुंबातील किस्सा या अनुषंगाने शेअर करावासा वाटतो.माझी मोठी मुलगी स्नेहल जीने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात एम.ए.परफॉर्मीग आर्ट्सची पदवी घेऊन पुण्यात स्वत:चा ” वयम् डान्स स्टुडिओ ” सुरू केला.तर दुसरी प्रिया हिने पुण्यातून फर्ग्युसन मधून बारावी झाल्यावर मुंबईत रूहिया काॅलेजमधून मास मिडियाची डिग्री घेऊन पुन्हा फॅशन डिझायनिंग मध्ये एम.एस्सी करून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.दोघही हुशार निदान दोघांपैकी एकाने तरी सनदी अधिकारी व्हावे अशी माझी अपेक्षा होती.यासाठी या दोघानाही चाणक्यचे मा.अविनाश धर्माधिकारी यांचेकडे घेऊन गेलो होतो.प्रत्यक्ष ओळख असल्याने त्यानी यासाठी तब्बल पाऊण तास समुपदेशन केले.मात्र या दोन्ही मुलीनी आपला वेगळा मार्ग स्विकारला.आम्ही त्याला विरोध केला नाही.
सोशल मिडीयामुळे प्रत्येकजण आपण परफेक्ट असल्याचे भासवत असला आणि वरवर माझे अतिशय चांगले चालले आहे असे दाखवत असले तरी अनेकजण हे आतून तुटलेले असतात अशावेळेस प्रेमाने सुसंवाद साधणारी प्रक्रिया या मोबाईलमुळे संपुष्टात आलेली आहे.समाजमाध्यामातून दुसर्यांचे झगमगाटी आयुष्य पाहून स्वतःमधे न्यूनगंड निर्माण होतो..मी त्याच्या सारखा काहीच करू शकत नाही.या माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही म्हणून आत्महत्या करतो.मानसिक अस्वस्थता,आणि सामाजिक बदल ही जशी कारणे आहेत तशीच विभक्त कुटुंबामुळे आपल्या भावना मोकळेपणाने मांडण्याचे मार्ग संपले.पूर्वी एकञ कुटुंबात काही वाकडं पाऊल पडले तर कान पकडणारे आजी- आजोबा होते तसेच प्रेमाने जवळही करत असतं..तण आज आजी आजोबांचं बिचारे वृध्दाश्रमात आहेत.
आत्महत्येची कारणमिमांसा करताना इतर अनेक गोष्टीं कारणीभूत आहेत.नात्यातील गुंतागुंत, प्रेमभंग,मैञीतील दुरावा,एकतर्फी प्रेम ,नात्यातील फसवणूक, भावनिक क्षमतांवर संयमाने मात करण्याचा अभाव,धैर्य व संयमाचा अभाव,झटपट यश मिळवण्याची धडपड, छोट्या यशाने खचून जाणे अशामुळे तरूण वर्ग आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे.
मानसिक आरोग्या बरोबरच शारीरिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.अमली पदार्थाचे सेवन,मोबाईलचा अतिरेकी वापर केल्याने अपुरी झोप होते त्यामुळे चिडचिड आणि नैराश्य वाढते.यासाठी आता डिप्रेशन किंवा अँक्झायरी (चिंता) याच्याकडे एक आजार म्हणून पाहिले पाहिजे.अपयशांचा स्विकार,तरुणांशी संवाद आणि भावनिक व मानसिक आधार दिला तर या समस्येवर थोडाफार दिलासा मिळू शकतो.
यासाठी शासन स्तरावर काही आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे.फक्त नवीन शैक्षणिक धोरण आणून चालणार नाही.या समस्येचा विचार करता शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे.मोठ्या शाळा काॅलेजमधून मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकाची नेमणूक केली पाहिजे.सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट करून याचा काही उपयोग होणार नाही.बेकारीमुळे सुध्दा आत्महत्या होत आहेत.यासाठी जीवन कौशल्य विभाग अधिक प्रभावशाली करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करून रोजगार निर्मीती केल्यास युवकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण होवू शकते.केवळ पुस्तकी ज्ञानाने ही गंभीर समस्या दुर होवू शकत नाही.
यासाठी आरोग्य यंञणेचे सक्षमीकरण होणे अत्यावश्यक आहे.रोजगाराच्या संधी,आर्थिक सुरक्षा,तरूण उद्योजकांना प्रशिक्षण व पाठबळ देणे,सायबर सेल अधिक प्रभावी केल्यास ब्लॅकमेलिंग मुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण कमी होवू शकते.
मानसिक आरोग्य संरक्षण कायदा (Mental Health Care Act) २०१७ हा फक्त कागदावरच राहिला त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.या कायद्या अंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत DMHP,(District Mental Healthcare Programe)यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जेथे शारीरिक आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत तेथे ही अपेक्षा करणे धाडसाचे होईल. मानसिक आरोग्याचे निदान होण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक हे उपलब्ध असले पाहिजेत.
जीवनाला कंटाळून किंवा आव्हाने पेलण्याची आणि आपल्या सुंदर जीवनाबद्दल सकारात्मक विचार करण्याची मतीच कुंटीत झाल्याने तरूण मुले- मुली सहजपणे मृत्यूला कवटाळून कायमची निघून जातात पण ज्या जन्मदात्या आईबाबांनी आपल्या इच्छा मारून तुमचे पालनपोषण केलेले असते,हाल अपेष्टा भोगलेल्या असताना त्यानी तुमच्या पश्चात आपले जीवन कसे व्यतीत करावे ?
