You are currently viewing सैनिक घडविण्यासाठी नोकरी सोडणारा सैनिकी माणूस….सुधीर चक्रे.

सैनिक घडविण्यासाठी नोकरी सोडणारा सैनिकी माणूस….सुधीर चक्रे.

*सैनिक घडविण्यासाठी नोकरी सोडणारा सैनिकी माणूस….सुधीर चक्रे.*

माझ्या माहितीप्रमाणे भारत सरकारने परमवीरचक्र देऊन गौरविलेले सैनिकी अधिकारी अमरावतीला पहिल्यांदा येत आहेत.त्यांचे नाव आहे कॅप्टन योगेन्द्र सिंग यादव .त्यांच्या परमवीर चक्राला कारगिलच्या युद्धाची धार आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला अमरावती शहरांमध्ये आणण्याचा धाडस एका सैनिकी माणसाने केलेले आहे आणि सैनिक घडविण्यासाठी नोकरी सोडणाऱ्या व धडपडणाऱ्या या माणसाचं नाव आहे “श्री.सुधीर चक्रे”. परमवीर चक्र धारण करणाऱ्या श्री.योगेन्द्र यादव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलेले आहे .त्यांनी आपल्या शरीरावर झेललेल्या शत्रुचे वार याची साक्ष देतात. खरं म्हणजे प्रसंगी त्यांना वीर मरणही आलं असतं. पण त्या वीरमरणालाही सामोरं जाण्याची तयारी या माणसाची होती. पण थोडक्यात बचावले .त्यांनी जे साहस दाखवलं त्या साहसाबद्दल भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र देऊन गौरव केला आहे. अमरावतीच्या अती भव्य अशा सांस्कृतिक भवन मध्ये रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता परमवीर चक्रधारक कॅप्टन योगेन्द्र यादव हे अमरावतीकरांना भेटणार आहेत .या कार्यक्रमाला जोडूनच स्वरांजली हा संगीतमय कार्यक्रम पण ठेवलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील मुले सैनिकी प्रशासनामध्ये गेली पाहिजेत किंवा सैनिक म्हणून गेली पाहिजेत यासाठी सतत धडपडणारा माणूस आणि त्यासाठी लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या सोडणारा माणूस म्हणजे सुधीर चक्रे असं समीकरण करावं लागेल .शेवटची नोकरी सोडली तेव्हा ते मुंबईच्या आयकर विभागामध्ये सहाय्यक म्हणून कार्यरत होते .मुंबईच्या आयकर विभागातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडणाऱ्या माणसाला कोणी वेड्यातच काढेल .पण हा माणूस ध्येयवेडा आहे. या ध्येयवेडयाला चांगली दृष्टी आहे .कारगिलच्या युद्धामध्ये श्री सुधीर चक्रे हे पण कार्यरत होते. जिथे प्यायला पाणीही मिळत नाही आणि तापमान हे मायनस 55 डिग्री इतके खाली आहे .
त्या शियाचीन या ठिकाणी त्यांनी काम केलेले आहे. आणि म्हणून माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सैनिक घडवले पाहिजेत हे ब्रीद वाक्य त्यांनी हृदयाशी बाळगले आहे .सैनिकी शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी परमवीरचक्रधारक कॅप्टन योगेन्द्र यादव यांना निमंत्रित केले आहे .श्री सुधीर चक्रे यांची यांची माझी ओळख व्हायला दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत .आमच्या महापौर बंगल्यासमोरील जिजाऊ नगरला लागूनच राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर आहे .लोक या भागाला यंकय्या पुरा या नावाने ओळखतात .त्या भागात राहणारा हा माणूस सैन्यातून निवृत्त झालेला आणि अमरावतीच्या चँरिटी कमिश्नरच्या कार्यालयात रुजू झालेला एक दमदार माणूस .सुधीर चक्रे हे असं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांची छाप समोरच्या व्यक्तीवर पडते .उंच शरीरयष्टी सैन्यात राहून कमावलेले शरीर बोलण्यामध्ये करारीपणा आणि चेहऱ्यावरचे हास्य हे त्यांचे कायम दर्शन सुधीर चक्रे यांच्यामध्ये सामावलेले आहे .त्यांनी सैनिकी शिक्षण देण्यासाठी आपल्या यंकय्यापुरा ह्या भागातच करिअर केअर अकॅडमी सुरू केली. यामागे कोणताही आर्थिक लाभ नव्हता .ना नफा न तोटा या न्यायाने त्यांनी ही अकादमी सुरू केली. इमारती भाडयाने घेतल्या .सैनिकी अकादमीला आवश्यक तेवढ्या सर्व सुविधा त्यांनी तयार करून घेतल्या .माझे विद्यार्थी डॉ.गुणवंत डहाणे त्यांच्या मदतीला आले .त्यांनी त्यांच्या होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनची दोन मजली इमारत सुधीर
चक्रेंच्या हवाली केली. त्यामुळे कामाला वेग आला. ते ज्या महार बटालियनमध्ये कार्यरत होते त्या महार बटालियनमधील त्यांचे सगळे अधिकारी व त्यांचे सगळे मित्र कामाला आले. त्यांनी मदतीही केली. काही त्यांचे सैनिक बांधव प्रत्यक्ष मदत करायला अमरावतीला आले. मैदान तयार झाले. सराव सुरू झाला. श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि अमरावती जिल्हा स्टेडियम इथल्या अधिकारी लोकांनी मदतीचा हात दिला क्रीडा संचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सहकार्य केले आणि अमरावतीला करिअर केअर अकॅडमी श्री सुधीर चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली ती तारीख होती 29 सप्टेंबर 2015. या सात वर्षात करिअर अकादमी यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर अनेक विद्यार्थी घडवले .अनेक अधिकाऱ्यांनी करिअर अकादमीला भेटी दिल्या .मी देखील सुधीर चक्रे यांच्याबरोबर होतो आहे व राहिलही. एक दमदार माणूस एक दमदार काम करतो याचा मला अभिमान आहे. नाहीतर अकादमीच्या नावाखाली आपला स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून घेणारे अनेक लोक भारतामध्ये पसरलेले आहेत .चक्रेसरांच्या ठिकाणी जी तळमळ आहे ती त्यांच्याकडे असल्याचे कारण नाही .स्वतःच्या देशाच्यासाठी सर्व दिवस उभा राहणारा आणि मायनस 55 डिग्री मध्ये सियाचीनमध्ये काम करणारा हा सैनिक निष्ठावंतच आहे आणि ती निष्ठा त्यांनी लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या सोडून सिद्ध करून दाखविलेली आहे .ते लोक होते वेगळे .गर्दीचे जे गेले पुढे. मी मात्र मागे वळूनी पाहतो. मागे किती जण राहिले .या न्यायाने मागे राहिल्यांना दिलासा देण्याचं त्यांना मदतीचा हात देण्याचं व पुढे नेण्याचं काम हे ब्रीदवाक्य त्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे. आज देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक हे सर्वसामान्य कुटुंबातीलच असतात. श्रीमंत कुटुंबातील सज्जन लोक आपल्या मुलांना सैन्यात पाठवत नाहीत. जातो तो बिचारा ग्रामीण भागातला आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेला मुलगाच .सुधीर चक्र तसेच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर रोडवरील सोलापूरचे. भरपूर मोठी जमीन त्यांच्या ट्रस्टच्या नावाने आहे. खरं म्हणजे एक सुखवस्तू माणसाचं आयुष्य हा माणूस केव्हाही जगू शकला असता .चांगली 7778 या क्रमांकाची चांगली मोठी गाडी त्यांच्याकडे आहे .बुलेटही होती. पण एका सामाजिक कार्यक्रमासाठी त्यांनी बुलेटही विकून टाकली .माझा कार्यक्रम सांस्कृतिक भवनमध्ये झाला पाहिजे हा त्यांचा माझ्यासारखाच हट्ट असतो आणि त्यासाठी प्रसंगी बुलेट विकायची त्यांची तयारी होती व आहे. मित्रांनो अशी माणसं दुर्मिळ असतात. सैन्यातून निवृत्त झाले म्हणजे त्यातून मिळालेल्या पेन्शनवर सैन्यातून मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर त्यांना एखादे दुकान थाटता आलं असतं. त्या ठिकाणी एखादा उद्योग उभारता आला असता .पण त्यांनी उद्योग उभारला तो सैनिक घडविण्याचा .पण हा उद्योग कसा ? ना नफा ना तोटा या तत्त्वावर आणि त्यांना प्रतिसादही त्यांच्या महार बटालियनच्या लोकांनी खूप चांगला दिला. आज दि.18 ला अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये सायंकाळी सहा वाजता परमवीरचक्रधारक कॅप्टन योगेंद्रसिंग यादव अमरावतीच्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी हा मोठ्या दर्जाचा कारगिलच्या युद्धामध्ये स्वतःचा प्राण पणाला लावून लढणारा लढवय्या शूरवीर अमरावती शहरात येत आहे आणि त्यांना आणण्याचं धाडस करणारा तेवढाच लढवय्या शूरवीर म्हणजे सुधीर चक्रे .मित्रांनो प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा हा सैन्यात असला पाहिजे .त्याशिवाय सैन्यातील लोकांचं जीवन आपल्याला कळणार नाही .देशाचे रक्षण आपल्याला करता येणार नाही. माझे स्वतःचे जावई श्री सारंग वानखडे सैन्यात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. लेफ्टनंट कर्नल आहेत आणि माझे व्याही व्ही एस एम श्री विजय वानखडे व्हाईस एअर मार्शल म्हणून सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत.या देशाला फक्त दोनच लोक वाचवू शकतात. एक आहेत सीमेवर लढणारे आपले जवान. आणि दुसरे आहेत आपल्या शेतात आपल्यासाठी अन्नधान्य पिकवणारे शेतकरी .पण या दोन लोकांची कदर आपण करीत नाही. सिने कलाकारांना पद्मश्री मिळते .परंतु अजून शेतकऱ्याला पद्मश्री मिळाल्याचे आठवत नाही. पण हे दिवस पालटतील आणि असे दिवस येतील की त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्यांचा सैनिकांचा सन्मान करावाच लागेल. शेतकऱ्यांचे महत्त्व कोरोना महामारीने सिद्ध करून दाखविलेले आहे .आपण कुठल्याही क्षेत्रात असा शेतकऱ्यांचा आणि सैनिकांचा सन्मान करणे शिका एवढ्याच संदेश या निमित्ताने मला द्यावासा वाटतो.श्री सुधीर चक्रे यांनी सैनिक घडविण्याचा जो महायज्ञ प्रारंभ केला आहे. या कामात त्यांना त्यांचे सहकारी श्री संदीप गवई हे 24 तास सेवा देत आहेत . या सर्व चक्रे परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि परमवीर चक्रधारक कॅप्टन श्री योगेंद्र सिंह यादव यांचे स्वागत करण्यासाठी आपण रविवार दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या भव्य नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करतो .या आमच्या उपक्रमाला सहकार्य करणारे डॉ. गुणवंत डहाणे व त्यांचे सर्व सहकारी यांचे या आयोजनाबद्दल मनःपूर्वक आभाही मानतो .तसेच श्री सुधीर चक्रे या लढवय्या वीराला साथ देणाऱ्या त्यांच्या सैनिकी बांधवांना नमन करतो. चला मित्रांनो सैनिकांचा सन्मान करू या .त्यांना आदराने प्रेमाने वागवू या आणि या समाजामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी धडपड करणाऱ्या संस्थांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहू या. हम होंगे कामयाब. मन मे है विश्वास .पुरा है विश्वास. हम होंगे कामयाब .प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती 9 8 9 0 9 6 7 0 3

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =