मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कुत्रा आडवा आल्याने गाडी दुभाजक ओलांडून पलटी
मळगाव जोशी मांजरेकरवाडी सर्कलजवळ घटना; चालक-प्रवासी बालबाल बचावले, वाहनाचे मोठे नुकसान
सावंतवाडी
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीला मळगाव येथील जोशी मांजरेकरवाडी सर्कलजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन कोसळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने चालक व प्रवासी बालबाल बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गाडी कुडाळवरून गोव्याच्या दिशेने जात होती. मळगाव परिसरात गाडी पोहोचताच अचानक एक कुत्रा गाडीसमोर धावत आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरात ब्रेक लावला. मात्र वेग जास्त असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.
दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला झेप :
नियंत्रण सुटलेली गाडी महामार्गावरील दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन कोसळली. सुदैवाने, त्या वेळी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघातात गाडीच्या पुढील भागाचा व डाव्या बाजूचा मोठा चुराडा झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गाडीत असलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महामार्गावर भटक्या जनावरांचा वाढलेला वावर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून प्रशासनाने वारंवार वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.
