You are currently viewing खास.नारायण राणे : एक झंझावात
Oplus_16908288

खास.नारायण राणे : एक झंझावात

 

सिंधुदुर्ग जिल्हा हे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही उच्चारलं तरी “राणेंचा जिल्हा काय…?” असा प्रश्न समोरून येतो. एवढी ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्याची राणेंमुळे झाली आहे यावरून “नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग म्हणजे राणे” हे समीकरण तयार झाले आहे. आजपर्यंत किती नेते कोकणात आले, पालापाचोळा बनून उडून गेले परंतु राणे एक झंझावात बनून आजही भक्कमपणे उभे आहेत. राणे हे कुठले ब्रँड ॲम्बेसेडर नाहीत तर राणे स्वतःच एक ब्रँड आहेत. ज्याची ओळख संपूर्ण देशाला झाली आहे. आज नारायण राणेंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जात आहे. कारण, राणेंवर निस्सिम प्रेम करणारी जिल्ह्यातील जनता आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. “राणे समर्थक” हे बिरूद मिरवणारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांच्या मागे पुढे ताठ मानेने फिरते आहे ती केवळ दादांच्या आशीर्वादावर…! दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरील रेषा समजणारे कार्यकर्ते साथीला असल्यानेच आजही राणे जिथे असतील तिथे झंझावात येत असतो.

 

     नव्वदच्या दशकात नारायण राणे सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्याने प्रवेशकर्ते झाले तोपर्यंत राणेंची ओळख जिल्ह्याला नव्हती. परंतु मुंबईतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने जिल्ह्यात आलेले राणे भगवे वादळ बनून आजपर्यंत घोंघावत राहिले आहेत. मध्यंतरीची काही वर्षे काँग्रेसमध्ये घालवलेला काळ वगळता राणेंनी हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडलेला नाही. ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले तरी “राणे समर्थक” हा राणेंचा विचार घेऊन आलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा नेहमीच आपले वेगळेपण जपत राहिला. जिल्ह्यात काँग्रेस वाढली पण राणे काँग्रेसमध्ये गेले की काँग्रेस राणेंमध्ये गेली..? असा प्रश्न उपस्थित झालेला. राणे भाजपमध्ये गेल्यावर देखील अशीच परिस्थिती कायम राहिली. त्यामुळे भाजपला आपला हुकूमचा एक्का जिल्ह्यात पाठवावा लागला. तरीही “राणे समर्थक” राणेंच्या सोबतच राहिले. त्यामुळे राणे कुठल्या पक्षात गेले तरी तिथे राणे हे एक स्वतःच एक पक्ष बनलेले असतात. त्यामुळे राणेंचा जिल्ह्यात आजपर्यंत बोलबाला राहिलेला असून राणेंच्या शब्दाला तेवढंच वजन आहे.

 

      एकवेळ जिल्ह्यावर भक्कम पकड असलेल्या राणेंची पकड थोडीशी सैल झाली आणि राणे संपले अशा वावड्या उठू लागल्या. परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्याची जर ताकद कोणात असेल तर ते नारायण राणे. अपयशावर मात करत राणेंनी जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा आपली पकड मजबूत केली एवढेच नव्हे तर खासदारकीची निवडणूक एकहाती जिंकून जिल्ह्यात भाजपाचा खासदार निवडून आणला. राणेंना आव्हाने नवीन नाहीत. राजकारणात आल्यापासून त्यांनी आव्हाने लिलया पेलली आहेत. त्यामुळेच केवळ आमदार, मंत्री म्हणून न राहता त्यांनी शिवसेनेचा कोकणातील मुख्यमंत्री बनून कोकणची ओळख अवघ्या देशाला करून दिली. एवढेच नव्हे, आपल्या मुख्यमंत्री पदाच्या अल्प कालावधीचा सकारात्मक उपयोग करताना महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेत राज्याच्या विकासाला गती दिली आणि गतिमान सरकार म्हणून शिवसेना सरकारची ओळख बनवली होती. मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणात रस्ते, वीज, पाणी प्रश्न निकाली काढताना जिथे कधीही रस्ते, वीज पोचली नव्हती तिथे रस्ते तयार झाले, ज्या घरांनी वीज म्हणजे रॉकेलचे दिवे म्हटले तिथे विजेचे बल्ब पेटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत सुविधा जलद गतीने निर्माण झाल्या. त्यामुळे राणे म्हणजे विकास असे एक नवे समीकरण जिल्ह्याने तर पाहिलेच पण राज्याने सुद्धा अनुभवले. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनातील एक सर्वसामान्य कोकणी माणूस मुख्यमंत्री झाला आणि बाळासाहेबांनी देखील मुख्यमंत्री कसा असावा तर राणेंसारखा असावा असे सांगावे एवढे उत्तम काम राणेंनी मुख्यमंत्री पदाच्या अल्पशा कारकीर्दीत केले.

 

     काही काळ दहशत, गुंडागर्दी, मारामारीशी राणेंचा संबंध जोडला गेला. त्यामुळे राणेंची राजकीय कारकीर्द वादातीत राहिली. परंतु, ज्यावेळी जिल्ह्यातील गोरगरिबांना मदतीची अपेक्षा असते तेव्हा कोण कुठल्या पक्षाचा किंवा कुणाचा माणूस हा भेदभाव न करता नारायण राणे अनेकांच्या पाठीशी आधार बनून उभे राहिले. त्यामुळे कित्येकांना राणे देवाच्या रूपात सुद्धा भेटले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांवर कधी संकट आले तर वाटेल तेवढा खर्च करून कार्यकर्त्याला उभा करण्याची जबाबदारी पालक म्हणून राणेंनी उत्तमरित्या निभावली आहे. आज आम.निलेश राणे देखील वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेऊन माणसे जपण्याचे काम करताना दिसून येतात, हे राणेंचे मुलावर असलेले संस्कार आहेत. राणेंच्या आशीर्वादावर अनेक कार्यकर्त्यांचे उद्योगधंदे उभे राहिलेत, कार्यकर्ते ठेकेदार म्हणून उदयास आले, कित्येकांचे घरसंसार चालले आहेत. राणेंनी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नेते घडवले आहेत. केवळ त्यामुळेच राणे ही एक कार्यकर्ता निर्मितीची कंपनीच बनून राहिली, म्हणून राणेंच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी असलेली दिसून येते. 

 

      लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री, खासदार कसा असावा..? हे नारायण राणेंनी दाखवून दिले. जिथे अधिकारी नेत्यांना, मंत्र्यांना जुमानत नाहीत तिथे नारायण राणेंचा आदेश अधिकारी कधीही खाली पडू देत नाहीत. एवढी आदरयुक्त भीती नारायण राणेंची अधिकाऱ्यांच्या मनात आजही आहे. असा अधिकाऱ्यांवर इतर कोणाचाही वचक आजपर्यंत जिल्ह्याने पाहिलेला नाही. काम होणार असेल किंवा नसेल तरी इतर नेते “होय” म्हणून शब्द देऊन मोकळे होतात परंतु, नारायण राणे बसल्या जागेवरूनच अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम तात्काळ करून घेतात ही त्यांची काम करण्याची पद्धत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस राणेंकडे बेझिजक जाण्यास तयार असतो. कारण, “राणे म्हणजे काम फत्ते” ही प्रत्येकाची खात्री असते. 

 

     राणेंचे राजकारण, जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आणि जिद्द ही जिल्ह्यातील जनतेने पाहिली आहे. कित्येकदा रागावलेले, भडकलेले, गरजणारे राणे जिल्ह्याने अनुभवले आहेत. परंतु…, पालक, आधारस्तंभ म्हणून जिल्ह्यातील कित्येक निराधारांचा आधार बनलेले राणे अनेकांना ज्ञात नाहीत. राणेंची एक बाजू सर्वांनी पाहिली पण, दुसरी बाजू पाहण्याच्या, समजण्याच्या फंदात कोणी कधी पडलेच नाहीत, ती बाजू केवळ त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे.. आणि राणेंनी कधी आपल्या कामाचे मार्केटिंग केले नाही त्यामुळे राणेंची भक्कम बाजू नेहमीच झाकोळलेली राहिली.

     आजही वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करताना जिल्ह्याच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले नारायण राणे म्हणजे एक झंझावात आहेत, जो वाढत्या वयानुसार तेवढाच प्रभावीपणे झंझावत आहे. अशा या कार्यतत्पर झुंजार नेत्याला संवाद मीडिया कडून अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा…!💐

प्रतिक्रिया व्यक्त करा