You are currently viewing वेतोरेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर

वेतोरेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर

*वेतोरेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर*

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी; नागरिकांनी लाभ घ्यावा

समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत श्री देवी सातेरी मित्रमंडळ, वेतोरे यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
खासदार नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर व प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. प्रशासनातील निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) मंत्री म्हणून त्यांनी उद्योगविकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. कोकणातील पायाभूत सुविधा, पर्यटन व रोजगारनिर्मितीमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत साई योगेश्वरी हॉल, वेतोरे येथे हे आरोग्य शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर यांचे सहकार्य लाभले असून महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गतही सेवा देण्यात येणार आहेत.
शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजेश्वर उबाळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. सौरभ पाटील, नेत्र तज्ञ डॉ. अनिरुद्ध तेली तसेच दंत तज्ञ डॉ. तन्वी दि. गोडकर हे तज्ज्ञ नागरिकांची तपासणी करणार आहेत. प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या आरोग्य शिबिरात विशेषतः मोफत नेत्र तपासणी व दातांची तपासणी केली जाणार असून, विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ व खर्च वाचवून गावातच तज्ज्ञ सेवा मिळण्याची ही एक मोठी संधी ठरणार आहे.
या उपक्रमामागे समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि “निरोगी समाज” घडविण्याचा व्यापक उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक नाईक, प्रशांत नाईक, सुधीर गावडे व अजित नाईक हे संयोजक परिश्रम घेत असून अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा