You are currently viewing आंबोली, गेळे व चौकुळमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर; ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सौर दिव्यांची मागणी
Oplus_16908288

आंबोली, गेळे व चौकुळमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर; ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सौर दिव्यांची मागणी

पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांचे वनविभागाकडे निवेदन; रात्रीच्या वेळी जीवितास धोका वाढल्याची तक्रार

सावंतवाडी (प्रतिनिधी):

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आंबोली, गेळे आणि चौकुळ या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने सौर दिवे व बॅटरी संच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी वनविभागाकडे केली आहे.

या भागात घनदाट जंगल असून रानगवे, अस्वल, बिबट्या आणि हत्ती यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांना विशेषतः रात्रीच्या वेळी जीविताचा धोका निर्माण होत असून, शेतात जाणे व दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे.

यासंदर्भात उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले असून या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. आंबोली, गेळे व चौकुळ ही गावे पूर्णपणे जंगल परिसरात असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, या भागात अतिवृष्टी आणि दाट धुक्याचे प्रमाण अधिक असल्याने वन्यप्राणी सहज दिसत नाहीत. त्यामुळे अचानक हल्ल्याचा धोका अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या सुरक्षेसाठी सौर दिवे व बॅटरी संच अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करत या तिन्ही गावांमध्ये सौर दिवे व बॅटरी संच उपलब्ध करून ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मायकल डिसोजा यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा