*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ५७
*नको रे बाबा*
” त्या करात बाबाची काय भानगड रे? ” काकल्याने आल्या आल्याच प्रश्न टाकला.
“अशा गोष्टींकडे आपण लक्ष देऊ नये.” संभाव्य धोका ओळखून मी सावध भूमिका घेतली.
” आपण हुंजे कोन? झिलग्यानी काय? बायलानीच फकस्त तडे लक्ष दिवचो काय?” काकल्या खोलात उतरायचे ठरवून आला होता.
” तसं नव्हे रे. सर्वसामान्यांनी अशात पडू नये, असं मला वाटतं. ” मी सारवासारव केली.
” सर्वसामान्य नको हुंजे ह्यो शिरीमंतांचो इषय हा काय? काय ता पष्ट बोल मरे.” काकल्या मला अडचणीत आणू पहात होता.
मी हसलो.
” बुवा बाबांच्ये भानगडी ह्यो हसण्याचो इषय नाय. चर्चा करूकच होयी. तू टकलेर थण तांबयो घेवन गप उभो रवा नको. ” काकल्या काही केल्या मला सोडत नव्हता.
त्याने उकरून काढलेला विषय गंभीर होता अन् चक्रावणाराही होता. तसंच समाजाला हानी पोचवणारा होता, म्हणून काकल्या त्रस्त होता.
” हे बाबा बायलांका भ्रष्ट करतत, काय भ्रष्ट हत हून बायलो तडे जातत? कारण चिचारे लाखात खपयणाऱ्याकडे गरीब कोण जावचो नाय. गांजललो कोन जावचो नाय. जाणारे हे हवीस आसत.” काकल्या कडाडला.
” अरे, आता करातला पकडलाय. कोर्ट त्याला शिक्षा देईलच.” मी
“पून बायलो त्येच्या पेक्षा चड दोषी हत. “काकल्या.
“अरे, पण बायकांच्या चारित्र्याची काळजी घ्यावी लागते” मी समजावत राहिलो.
” कोंचा चारित्र्य? बाबाच्या नादाक लागले, थयच चारित्र्य सोपला.”काकल्या थोडा चिडलाच.
काकल्याला उत्तर देणे मला जड जात होते.
“बरा ते इन्कम टॅक्स वाले खय लिपलेहत? हजारात गडबड झाली तरी नोटीस येता हुंतत. मगे ह्या बाबाचा काय?” काकल्या वेगवेगळे प्रश्न टाकत होता.
” मग काय करायला हवं?” मी प्रतिप्रश्न केला.
“तुझ्यासारख्या बर्या लोकानी हेच्यात पडाक होया. सरकारार अवलंबून रवान उपेग नाय. प्रत्येकान आपल्या आसपासच्या बाबाक नायसो केलो, तरी खूप झाला.” काकल्याने उपाय सुचवला.
“नाही रे. हे कठीण आहे. बाबांना मोठ्यांचा वरदहस्त असतो.” मी अडचण सांगितली.
” मगे तुयाच बरोसो बाबा जा. झील मठ बांधीत. तेच्याय पोटापाण्याची सोय होयत.” काकल्या निर्वाणीचे बोलला.
“नको रे बाबा. मी माझ्याठिकाणी आहे, तो बरा आहे.” काकल्याला चहा देऊन मी सोडवणूक करून घेतली.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
