You are currently viewing तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचे अध्यक्ष विलास कुबल यांचे अल्प आजाराने निधन

तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचे अध्यक्ष विलास कुबल यांचे अल्प आजाराने निधन

देवगड :

तालुक्यातील तांबळडेग गावचे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ “गुणवंत कामगार पुरस्कार” प्राप्त श्री. विलास वसंत कुबल यांचे अल्प आजाराने दि. ३१ मार्च रोजी निवासस्थानी दुःखद निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ते १०६ वर्षे पूर्ण झालेल्या तांबळडेग मुंबईस्थित शैक्षणिक शिक्षणोत्कर्षक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी हे पद दोन वेळा भुषविले होते. तसेच तांबळडेग गावच्या समस्यांचे निवारण व्हावे यासाठी त्यांनी ग्रामसेवा संस्था निर्माण केली होती. ते आमदार अशोक पाटील यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासात बऱ्याच जणांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला तसेच कित्येकांची मंत्रालय स्तरांवरील कामे पूर्ण करून दिली होती. त्यांना आपल्या गावाविषयी आत्मीयता होती. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सामाजिक कार्यकर्ता अशी प्रतिमा जनमानसात निर्माण केली होती. विलास कुबल हे कुटुंबासाठी आधारवड होते. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता, मुलगी, भाऊ अनिल, किरण, संजय, ऍडव्होकेट राज कुबल, विवाहित बहीण, भावजया असा परिवार आहे. विलास कुबल यांचा स्वभाव लोभसवाणा आणि परोपकारी वृत्तीचा होता. त्यांच्यावर भांडुप (पश्चिम) येथील हिंदू स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे दहावे दि.९ एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे होणार असून बारावे तेरावे राहत्या घरी भांडुप पश्चिम या ठिकाणी करण्यात येणार आहे. असे कुबल कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा