You are currently viewing बाळा गावडे पुन्हा ‘सेने’त सक्रिय; उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नवी जबाबदारी

बाळा गावडे पुन्हा ‘सेने’त सक्रिय; उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नवी जबाबदारी

दीड वर्षांच्या राजकीय अज्ञातवासानंतर सेना भवनात स्वगृही परत; सावंतवाडी मतदारसंघाची संघटनात्मक धुरा सोपवली

सिंधुदुर्ग / (प्रतिनिधी):

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सोमवारी मुंबई येथे सेना भवनात स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवादासाठी निमंत्रित करून गावडे यांना पुन्हा पक्षात सक्रिय केले.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रभावी संघटनात्मक काम करत असताना अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने बाळा गावडे यांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जुने-नवे शिवसैनिक एकत्र करून संघटना उभी केली होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात असताना, ऐनवेळी माजी आमदार राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावडे यांनी दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.

मात्र निवडणुकीनंतर ते राजकीयदृष्ट्या निष्क्रिय राहिले होते. दरम्यान, पुन्हा सक्रिय होण्यासाठी उबाठा गटाच्या नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधला जात होता.

शेवटी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटीसाठी बोलावून संवाद साधला आणि पक्षात सक्रिय केले. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा