You are currently viewing देवरुखमध्ये आधुनिक फिश मार्केट उभारणीला गती; जागा निश्चितीसाठी तातडीचे आदेश

देवरुखमध्ये आधुनिक फिश मार्केट उभारणीला गती; जागा निश्चितीसाठी तातडीचे आदेश

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून प्रकल्पाला चालना – लोकांच्या सोयीला प्राधान्य देण्याच्या सूचना : मंत्री नितेश राणे

मुंबई :

देवरुख नगरपंचायत हद्दीत आधुनिक फिश मार्केट उभारणीसाठी योग्य जागा तातडीने निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत प्रस्तावित मत्स्यबाजार प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, फिश मार्केट उभारणी करताना केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयींचाही विचार करणे अत्यावश्यक आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ असूनही विक्रेते पारंपरिक ठिकाणे सोडत नाहीत, त्यामुळे नवीन जागा निवडताना लोकांची ये-जा, सवयी आणि व्यवहार्यता लक्षात घेणे गरजेचे आहे.

यासोबतच प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद स्तरावर समन्वय साधून जागा निश्चित करावी. इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रकल्पासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

देवरुखमध्ये उभारण्यात येणाऱ्या या आधुनिक फिश मार्केटमुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांना सुटसुटीत सुविधा मिळून व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा