डोक्यात गोळी लागल्याचा संशय; पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल
कणकवली :
शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथे संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने कणकवली तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रथमदर्शनी दळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून ती बंदुकीची गोळी लागल्यासारखी दिसत आहे. त्यामुळे हा अपघात, आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी घटनास्थळी दिसणाऱ्या परिस्थितीमुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताचे डागही आढळून आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली आहे.
पोलीस अधिक तपास करत असून लवकरच घटनेमागील सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
